wadavani dharan

उर्ध्व कुंडलिकाचे दोन दरवाजे उघडले

न्यूज ऑफ द डे बीड वडवणी

 वडवणी : गुरुवारी (दि.23) रात्री जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात झाली. वडवणी तालुक्यातही मुसळधार पाऊस सुरु होता. त्यामुळे उर्ध्व कुंडलिका प्रकल्पाचे पाणी नदी पात्रात सोडण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी गुरुवारी रात्री साडे अकराच्या सुमारास दिली. त्यानुसार प्रकल्पाचे गेट नंबर 1 आणि 5 दहा सेंटिमीटरने उचलून नदीपात्रात विसर्ग सुरु केला आहे. असेही जिल्हाधिकारी यांनी कळवले आहे.

संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये सध्या वडवणी तालुक्यात सर्वाधिक पर्जन्यमानाची नोंद करण्यात आलेली आहे. तालुक्यातील जवळपास सर्वच लघु मध्यम प्रकल्प, नदी, नाले, विहीरी, तलाव ओसंडून वाहत आहेत. परिणामी सतत पडणार्‍या अतिवृष्टीच्या अनुषंगाने प्रशासनही योग्य ती दक्षता व खबरदारी घेत असून वडवणी तालुक्यातील मुख्य मध्यम जलप्रकल्प असणार्‍या सोन्नाखोटा येथील उर्ध्व कुंडलिका प्रकल्पामध्येही मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झालेला आहे. पाण्याचा विसर्ग हा पुढे नदीपात्रात केला जात असून परिणामी या प्रकल्पालगतच्या व नदी पात्राकाठच्या सर्व गावांना याचा सतर्कतेचा इशाराही प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. तरी नदीपात्रा लगतच्या सर्व शेतकरी व नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेच्या सूचना देत या नदीच्या पात्रात कोणीही जाऊ नये तसेच कोणीही नदीपात्रात आपली जनावरे सोडू नये सर्वांनी योग्य ती खबरदारी घ्यावी व संबंधित गावाच्या तलाठी व ग्रामसेवक यांना याबाबत गावात दवंडी देण्यात यावी अशा सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती माजलगाव उपविभागीय अधिकारी श्रीमती.शोभा ठाकूर तसेच वडवणी तहसीलदार श्रीकिशन सांगळे यांनी दिली आहे.

Tagged