हनुमान महाराज गिरी यांना जामीन

क्राईम गेवराई न्यूज ऑफ द डे बीड

बीड दि.8 : बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा तथा अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली चकलांबा पोलीस ठाण्यात कोळगाव येथील सुर्यमंदीर संस्थानाचे मठाधिपती हनुमान महाराज गिरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळ्यानंतर 26 ऑगस्ट रोजी गेवराईचे उपअधीक्षक स्वप्नील राठोड यांच्या पथकाने हनुमान महाराज गिरीला अटक केली. बुधवारी (दि.8) बीड जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

गेवराई तालुक्यातील कोळगाव येथील सुर्यमंदिर संस्थानाचे मठाधिपती हनुमान महाराज गिरी यांच्या विरोधात चकलांबा पोलीस ठाण्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी आपण आत्महत्या करत असल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयाच्या माध्यमातून व्हायरल करत बीड जिल्ह्यात खळबळ उडवली. माझ्या मृत्युला गावातील काही राजकीय व्यक्ती, पत्रकार, पीडित कुटूंब जबाबदार आहे. अवघ्या पाच मिनिटात मी गळफास लावणार असल्याचा तो व्हिडिओ बीड जिल्ह्यात खळबळ उडवून देणार होता. यानंतर महाराज बेपत्ता झाले. त्यांनी बीड न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज मांडला तो फेटाळण्यात आला. त्यानंतर त्यांनी पुन्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्व जामीनसाठी अर्ज केल्यानंतर हा जामीन फेटाळण्यात आला. अखेर 26 ऑगस्ट रोजी पोलिसांनी महाराजाला ताब्यात घेतले. बीड येथील न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. बुधवारी (दि.8) त्यांचा पुन्हा जामीन मांडल्यानंतर न्यायालयाने जामीन मंजूर केला. आरोपीच्यावतीने अ‍ॅड.शशिकांत सावंत यांनी काम पहिले. त्यांना सहकार्य अ‍ॅड.प्रेम ढाकणे, अ‍ॅड.तिपाले, अ‍ॅड.घोलप, अ‍ॅड.काळे, अ‍ॅड.बहीर यांनी सहकार्य केले.

Tagged