बीड एसीबीची कारवाई
बीड दि. 2 : सकारात्मक अहवाल दिल्यामुळे मिनी अंगणवाडीची मोठी अंगणवाडी झाली आणि अंगणवाडी सेविकेचे मानधनही वाढलं याचा मोबदला म्हणून पाच हजार रुपये लाचेची मागणी करणाऱ्या दोघी एसीबीच्या जाळ्यात अडकल्या आहेत. ही कारवाई बीड एसीबीने शुक्रवारी (दि.2) दुपारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय आष्टी येथे केली.
अमृता श्रीकांत हाट्टे (पर्यवेक्षिका एकात्मिक बाल विकास सेवा योजना आष्टी जिल्हा बीड वर्ग 3) व नीता रामदास मलदोडे (कनिष्ठ सहाय्यक एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प आष्टी जिल्हा बीड) अशा लाचखोरींचे नावे आहेत. तक्रारदार ही अंगणवाडी सेविका असून सदरची अंगणवाडी ही मलकापुर वस्ती ,पाटसरा ता .आष्टी येथील मिनी अंगणवाडी होती .लोकसेवक श्रीमती हट्टे यांनी सकारात्मक अहवाल दिल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या 10 जानेवारी 2024 च्या शासन निर्णया प्रमाणे सदर मिनी अंगणवाडी वर्धित होऊन मोठी अंगणवाडी झाली आहे .परिणामत: तक्रारदार यांचे मासीक मानधन देखील पण 6000 रुपयावरुण 10 हजार रुपये झाले. याचा मोबदला बक्षीस म्हणून पाच हजर रुपये द्या म्हणून लाचेची मागणी लोकसेवक श्रीमती हट्टे व श्रीमती मलदोडे यांनी केली. मलदोडे यांनी पाच हजार रुपये लाच रक्कम तक्रारदारकडून स्वीकारताना शुक्रवारी त्यांचे कक्षात पंचासमक्ष स्विकारताच रंगेहाथ पकडण्यात आले. दोन्ही महीला लाचखोर यांना ताब्यात घेण्यात आले असून आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे बीड उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी गुलाब बाचेवाड, श्रीराम गिराम, संतोष राठोड, सुदर्शन निकाळजे, सुरेश सांगळे, अमोल खरसाडे, अंबादास पुरी, गणेश मेहेत्रे यांनी केली.