बीड, दि.23 : अजित पवार गटाकडून आज दुपारी 38 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. तर काल एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची 45 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. बीडची जागा अजितदादा गटाला द्यायची की एकनाथ शिंदे गटाला याचं उत्तर अजुनही महायुतीला सोडविण्यात यश आलेले नाही. तर महाविकास आघाडीत ही जागा शरद पवारांच्या वाट्याला असल्याने या जागेवरून ते संदीप क्षीरसागर यांना पुन्हा चान्स देतात की ज्योती मेटे यांना तिकिट दिले जाते यावरूनही मतदारांची उत्सुकता ताणली गेली आहे.
गेवराईत महायुतीच्या जागावाटपात सद्यस्थितीत ही जागा भाजपाकडे आहे. परंतु विद्यमान आमदार लक्ष्मण पवारांनी लढण्यास नकार देत शरद पवारांशी संपर्क केला होता. त्यामुळे भाजपाने ही जागा अजित पवार गटाला देवू केली होती. इथून अजितदादा गटाचे विजयसिंह पंडित निवडणूक लढवणार आहेत. परंतु त्यांनी पक्षाच्या तिकिटाऐवजी अपक्ष लढण्यावर भर दिल्याचे दिसते. गेवराईच्या बदल्यात भाजपाला आष्टीची जागा हवी होती. परंतु अजितदादा गटाने गेवराईची जागा द्या किंवा नका देवू पण आष्टीची जागा मिळणार नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. त्यामुळे भाजपा या जागेवर कोणता उमेदवार रिंगणात उतरवणार की फुकटात अजितदादा गटाला ही जागा देणार याची उत्सुकताही ताणली गेली आहे. तर महाविकास आघाडीत गेवराईची जागा उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेला सुटली असल्याने येथील इच्छूक माजी मंत्री बदामराव पंडित यांच्या कार्यकर्त्यांनी घरासमोर फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला आहे. त्यामुळे विद्यमान आ. लक्ष्मण पवार अपक्षच लढतात की भाजपा पुन्हा एकदा त्यांनाच गळ घालते हे पहावे लागेल.
तर इकडे आष्टीची जागा अजित पवार गटाकडे आहे. परंतु पहिल्या यादीत आष्टीच्या आमदार बाळासाहेब आजबे यांचे नाव नाही. त्यामुळे या जागेवरून अजूनही महायुतीत वाद सुरू असल्याचे दिसत आहे. इथून भाजपाच्या तिकिटावर माजी आ. सुरेश धस यांना निवडणूक लढविण्याची इच्छा आहे. तर दुसरे इच्छूक असलेले माजी आ. भीमराव धोंडे यांनी आजच अपक्ष उमेदवारी अर्ज भरून पक्ष तिकिटाची अपेक्षा सोडलेली आहे. तुतारीकडून इच्छूक असलेले आणि अनेकांना आमदार, खासदार केलेले, थेट शरद पवारांच्या गळ्यातील ताईत असलेले महेबूब शेख यांना स्वतःच्याच तिकिटासाठी पक्षाकडे झगडावे लागत आहे.
केजच्या जागेवरून महायुतीतील भाजपाच्या विद्यमान आ. नमिता मुंदडा यांना पहिल्या यादीत तिकिट जाहीर करण्यात आले. इथे शरद पवार गट प्रमुख प्रतिस्पर्धी असणार असून या जागेवर माजी आ. पृथ्वीराज साठे, माजी आ. संगीताताई ठोंबरे आणि अंजलीताई घाडगे यांच्या नावांबाबत चाचपणी सुरू आहे.
माजलगावात अजित पवार गटाचे विद्यमान आ. प्रकाशदादा सोळंके यांनाच पुन्हा एकदा तिकिट जाहीर झालेले आहे. त्यामुळे त्यांचे पुतणे जयसिंह सोळंके काय निर्णय घेतात याकडे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या नजरा लागल्या आहेत. इथे शरद पवारांची राष्ट्रवादी प्रमुख प्रतिस्पधी असून रमेशराव आडसकर आणि मोहन जगताप या दोघांची तुतारीसाठी मोठी स्पर्धा सुरू आहे. तर तिसरीकडे माधवराव निर्मळ हे ओबीसी चेहरा म्हणून पुढे येत असून त्यांनीही आपण अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या मतदारसंघात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे.
परळीतून अपेक्षेप्रमाणे अजित पवार गटाकडून धनंजय मुंडे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. इथे शरद पवारांच्या पक्षाकडून राजाभाऊ फड, सुदामती गुट्टे आणि त्यांचे पूत्र तुतारीकडून उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
जयसिंह सोळंकेंच्या कार्यकर्त्यांचा हिरमोड
आ. प्रकाशदादा सोळंके यांनी मागच्या पंचवार्षिकमध्ये ही माझी शेवटची निवडणूक म्हणून प्रचार केला होता. तर आगदी दोन महिन्यापुर्वी त्यांनी राजकारणातील निवृत्ती जाहीर करून आपला राजकीय वारस म्हणून पुतण्या जयसिंह सोळंके यांचे नाव पुढे केले होते. पण आता पक्षाकडून जयसिंह सोळंके यांच्याऐवजी पुन्हा एकदा आ. प्रकाशदादा सोळंके यांनाच रिंगणात उतरविण्यात आले आहे. त्यामुळे जयसिंह सोळंके यांच्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाल्याचे दिसत आहे. अनेक समर्थकांनी भैय्या निर्णय घ्या आम्ही तुमच्यासोबत म्हणून सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहेत.
लक्ष्मण पवार, पुजा मोरे यांच्या निर्णयाकडे लक्ष
गेवराईची जागा महाविकास आघाडीच्या जागावाटपात शिवसेना उबाठा गटाला सुटली असल्याने या ठिकाणाहून भाजपा नको म्हणत शरद पवारांची भेट घेणारे विद्यमान आ. लक्ष्मण पवार यांनी आपली आमदारकी पणाला लावल्याचे दिसत आहे. ते काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. तर दुसरीकडे शरद पवार पक्षात दिड वर्षापुर्वी प्रवेश करणार्या पुजाताई मोरे यांनाही आता तुतारीचे तिकिट मिळणार नाही हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यांनाही पुढच्या राजकीय करिअरच्या दृष्टीने काहीतरी निर्णय घ्यावा लागणार आहे. त्या काय निर्णय घेतात याकडेही गेवराईकरांचे लक्ष लागले आहे.