- सीसीटीव्ही फुटेज तपासून अॅक्शन, शेकडो हायवांची कुंडली निघाली
- वर्षभरात एकाच हायवाने 269 ट्रिप मारल्याचे फुटेज समोर
केशव कदम । बीड
दि.6 : मागील अनेक वर्षापासून वाळू माफियांवर पाहिजे तशी कारवाई झालीच नाही. मात्र जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी वाळू माफियांसह प्रशासनातील हप्तेखोरांच्या नांंग्या ठेचण्यासाठी मनावर घेतल्याचे दिसत आहे. कारण मागील वर्षभरात टेंडर नसताना पाडळसिंगी टोलनाक्यावरुन वाळूने भरलेल्या हायवाचे सीसीटीव्ही फुटेज हस्तगत केले आहे. यावरुन या टिप्परने 269 खेपा केल्या असून 1614 ब्रास वाळूची वाहतूक केली आहे. या टिप्पर मालकाला 7 कोटी 36 लाख 10 हजार 786 रुपयांच्या दंडाची नोटीस जारी केली आहे. जर एका टिप्परने एवढा पराक्रम केला असेल तर शेकडो टिप्परने वाळू उपसा केलेला आहे. यावर कारवाई झाल्यास प्रशासनाला अब्जावधी रुपयांचा दंड वसूल होऊ शकतो असे चित्र आहे. जिल्हाधिकार्यांनी टिप्पर मालकाला तीन दिवसात नोटीसचा खुलासा सादर करण्यास सांगितले आहे. जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या कडक भूमिकेमुळे वाळूमाफियांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे.

गोकूळ किसन गायकवाड (रा.वासनवाडी ता.बीड) यांना जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, आपल्या मालकीच्या हायवा टिप्परने (एमएच-23, एयू-8123) अवैधरित्या वाळूची वाहतूक केली आहे. राष्ट्रीय महामार्ग धुळे-सोलापूर वरील पाडळसिंगी येथील टोलनाका येथून प्राप्त झालेल्या सीसीटीव्ही फुटेजआधारे असे निदर्शनास आले की, 15 जानेवारी 2024 ते 4 जानेवारी 2025 या कालावधीत या टिप्परने 269 वेळा ये-जा केलेली आहे. प्रत्येकवेळी आपल्या वाहनातून 40 मे.टन इतकी वाहनाच्या वजनासह नोंद झालेली आहे. आपण प्रत्येकवेळी 6 ब्रास पेक्षा अधिक वाळूचे नियमबाह्य उत्खनन व केल्याचे स्पष्ट होत आहे. वर्षभरात एकूण 1614 ब्रास अवैध वाळू उत्खनन झाले आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 चे कलम 48 (7) (8) नुसार दंडास पात्र आहे. त्यानुसार आपणास 7 कोटी 36 लाख 10 हजार 786 रुपयांचा दंड का आकारण्यात येऊ नये याबाबतचा खुलासा नोटीस मिळाल्यापासून तीन दिवसाच्या आत सादर करावा, अन्यथा आपणास काही म्हणावयाचे नाही, असे गृहीत धरुन आपणाविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येईल असे नोटीसमध्ये म्हटले आहे.

आरटीओ, एसडीओ
यांच्यासह बँकेला पत्र
सदर वाहनाच्या क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक झालेल्या सर्व घटनामध्ये वेगवेगळे दंड आकारण्याची कार्यवाही मोटर वाहन अधिनियमानुसार करण्यात यावी, वसुली करताना आवश्यक वाटल्यास वाहन जप्तीची कार्यवाही करण्यात यावी असे आरटीओंना आदेश दिले आहे. तसेच उपविभागीय अधिकारी यांनीही योग्य ती कार्यवाही करावी, तसेच टिप्परवर कर्ज असलेल्या बँकेलाही माहिती देण्यात आली आहे.

नेहमीप्रमाणे वाळूमाफियांकडून पथकावर
हल्ला झाल्याचा खोटा गुन्हा दाखल केला
जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी रविवारी गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथील वाळू घाटाची पाहणी केली. यावेळी मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळू उत्खनन झाल्याचे दिसून आले. यावर लक्ष ठेवणेही मंडळ अधिकारी, तलाठी यांची प्राथमिक जबाबदारी असताना ही जबाबदारी पार पाडण्यासाठी अक्षम्य दिरंगाई केली आहे. त्यामुळे शासनाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. तसेच वाळू गस्त पथकावर हल्ला झाल्याबाबत खोटा गुन्हा दाखल केल्यामुळे शासनाची प्रतिमा जनसामान्यात मलीन झाली असल्याचे जिल्हाधिकारी यांनी निलंबनाच्या आदेशात म्हटले आहे.
मंडळ अधिकारी, तलाठ्यांसह
शिपायाला निलंबनाचा दणका
अवैध वाळू उत्खननाकडे दुर्लक्ष करणार्या व हल्ला झाला म्हणून खोटा गुन्हा दाखल करणारे रेवकीचे मंडळ अधिकारी पकाले बाळासाहेब हरिदास, रेवकी सज्जाचे तलाठी गोविंद प्रभाकर नरवटे, आगरनांदूर सज्जाचे तलाठी गणेश तुळशीराम बावस्कर यांच्यासह तहसील कार्यालयातील शिपाई विठ्ठल रामराव सुतार या चौघांवर तडकाफडकी निलंबनाची कारवाई जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी केली आहे.

गेवराई तहसीलदार संदीप खोमणे
यांच्यावर मेहरबाणी दाखवू नका
सध्या जिल्हा प्रशासन अॅक्शनमोडमध्ये आहे. त्यातही गेवराईचे तहसीलदार संदीप खोमणे यांनी अजब शक्कल लढवली आहे. वाळू नसलेल्या ठिकाणचेही जप्त केलेले वाळूचे बोगस टेंडर केले आहेत. गोदाकाठावरील नागझरी, राजापूर, गंगावाडी, गुंतेगाव, बगपिंपळगाव येथील बोगस वाळू जप्तीचे टेंडर गडबडीत व तडजोड करून संबंधितांना देऊन कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केली आहे. यामुळे पुन्हा पावती दाखवून सर्रास वाळूचा उपसा केला जाणार आहे. हा एकप्रकारे दिशाभूल करण्याचा प्रकार तहसीलदार संदीप खोमणे यांनी केला. त्यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी राजेंद्र मोटे यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी साहेब, मुख्यालयातून
गायब झालेल्या टिप्परच्या ट्रिप मोजा
26 नोव्हेंबर 2024 रोजी जिल्हाधिकारी अविनाश पाठक हे गेवराईहून बीडकडे येत असताना त्यांना अवैध वाळू वातहूक करणार्या टिप्परने हुलकावणी दिली होती. जिल्हाधिकारी पाठक यांनी तातडीने आरटीओ, तहसीलदार यांना बोलावून (एमएच-48, सीक्यू-2789) व (एमएच-12, क्यूडब्लू-9597) या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या, परंतु यातील (एमएच-48, सीक्यू-2789) हा टिप्पर पोलीस मुख्यालयातून गायब झाला. या टिप्परनेही मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केल्याची माहिती आहे, त्यामुळे त्याचाही पाडळसिंगी टोलनाक्यावरुन सीसीटीव्हीचा आढावा घ्यावा अशी मागणी होत आहे.
