निवडणूक आयोगाचे निर्देश
नवी दिल्ली, दि. 4 : देशातील सर्वच पेट्रोल पंपावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो लावण्यात आलेले आहेत. आता हे सर्व बॅनर पंपावरून हटवा, असे आदेश निवडणूक आयोगाने पाच राज्यांना दिले आहेत. त्यामुळे मोदींच्या फोटोपासून वाहनधारकांची तुर्त सुटका झाली असे म्हणावे लागेल.
पेट्रोल पंपावर केंद्र सरकारच्या योजनांची जाहिरात करणार्या होर्डिंगवर पंतप्रधानांचा फोटो असणं आचारसंहितेचं उल्लंघन असल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. निवडणूक आयोगाने शुक्रवारी पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पद्दुचेरी या पाच राज्यांच्या निवडणूक तारखांची घोषणा केल्यानंतर आचारसंहिता लागू झाली. तृणमूल काँग्रेसने केलेल्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाकडून हा आदेश देण्यात आला आहे. तृणमूल काँग्रेसने करोना लसीकरण मोहिमेच्या पोस्टर आणि व्हिडीओंमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोचा वापर करण्यावरुन आक्षेप नोंदवला होता. निवडणूक आयोगाने पेट्रोल पंपांसोबतच करोना लसीकरण मोहिमेच्या प्रचारात वापरण्यात आलेला मोदींचा फोटोही 72 तासांत हटवण्यास सांगितलं आहे.
दरम्यान मागील काही दिवसात पेट्रोल आणि डिझेलचे भाव प्रचंड वाढलेले आहेत. त्यामुळे सरकारवर मोठा रोष असल्याचे पहायला मिळते. त्यातच मोदींच्या फोटोला हात जोडलेला एक फोटो प्रचंड व्हायरल झालेला होता.