धर्मापुरी येथील घटना
अंबाजोगाई : राजकीय वैमनस्यातून दोन गटात लाकडी काठ्या, खोरे व कोयत्याने झालेल्या तुंबळ हाणामारीत दोन्ही गटातील ११ जण जखमी झाले आहेत. ही घटना परळी तालुक्यातील धर्मापुरी येथे आज (दि.१३) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली.
राजकीय वैमनस्यातून दोन गटात हा वाद झाला. यात दोन गट आमने-सामने आले. या हाणामारीत दोन्ही गटाचे ११ जण जखमी झाले. गावातील नागरिकांनी वाद सोडविल्यानंतर जखमींना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. ९ जणांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तर दोघांना सुट्टी देण्यात आली. घटनास्थळी परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. घटनास्थळावरून लाकडी काठ्या, खोरे व कोयते जप्त करण्यात आले आहे. या घटनेने परिसरात दहशत पसरली आहे. स्थानिक व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली होती. दरम्यान, परळी ग्रामीण पोलिसांचा गावात मोठा बंदोबस्त होता.