मुषकराज पर्व 5 वे, भाग 1
बालाजी मारगुडे । बीड
हा नुस्ता मोदकं खाणारा मुषक नव्हता. तो बाप्पांचा कान, नाक, डोळा असं सगळंच होता. मुषकाच्या अंगात नाना कळा होत्या. गोड बोलायला लागला तर मधाहून गोड, कडू झाला तर मग कारल्याचा रस तरी बरा. चुरूचूरू बोलण्यात पटाईत असलेला मुषक सर्वगूणसंपन्न होता. साक्षात बाप्पांचा टकुर्यावर हात म्हटल्यावर त्याला काय कमी पडणार? कुठली मेख कुठं ठोकली म्हंजी जनावर जागच्या जागी बसल ह्याची मुषकाला कला अवगत होती. बीड जिल्ह्यातील बारीक सारिक खाचाखोचांचं मुषकाला ज्ञान होतं. कुणाच्या विहीरीत किती पाणी, कुणाचा तळ किती खोल, कुणाची विहीर गाळानं भरलीये हे एका नजरीत सांगणार. त्यामुळे यंदाही बाप्पांच्या पृथ्वीतलावरच्या यात्रेत मुषक नसणार हे कसे होईल? पृथ्वीवर जाण्याचा दिवस उद्यावर येऊन ठेपला होता. त्यामुळे मुषकाने आदल्या घडीनं बाप्पांचं निवास गाठले. सोबत आणलेला सगळा बाड बिस्तारा दारात टाकून मुषकानं मोठ्यानं आवाज दिला…
“बाप्पाऽ ओऽ बाप्पाऽऽ आवरा बिगीनं. उद्या दुपारून दिड पर्यंतचा म्होर्त सांगितलाय बामनाने. दिडचा टळला तर मग पाचच्या म्होरून हाय म्हणं”. “आरं एवढा घसा ताणाय काय झालं? भूत मागं लागलं काय तुझ्या?” बाप्पानं धोतराचा सोंगा हातात धरतच मेन दार गाठलं. समोर आलेल्या मुषकाला पाहून बाप्पा पुन्हा बोल्ले. “इतकीबी काय गडबड हाय का आपल्या मागं.. जाता येईल की जरा दमखाऊन… आता ह्या बारीला आपली कुणीबी वाट बघत नाय बग. मागच्या बारीला महिला मंडळीला माझा ‘लाडका बाप्पा’ कधी येणार अशी आतुरता असायची पण यंदा ती नाही. तिचं सगळं लक्ष ‘लाडक्या भावाची’ ओवाळणी बँकेत आली का नाय ह्याकडे लागलंय. अन् सगळे दाजी म्हणशील तर त्ये निवडणुकीकडं डोळं लावून बसल्याती. यंदा आपल्याला मोदकबी खायला मिळत्येत की नाय कळाय मार्ग नाय गड्या. आपल्यां आगमनासंगंच निवडणूक झाली अस्तीतर अजून लै झ्याक झाले अस्ते बग” बाप्पा बोल्ले.
“निवडणूक काय यंदाच टळलीय व्हंय… मागच्या चार सालापास्नं निवडणुकाच झाल्या न्हाईती. त्यामुळंबी कोण कोन्च्या पक्षात, कोण झेडपी मेंबर अन् कोण नगरपालिकेचा मेंबर कायच कळना झालंय मला तर” मुषकाचं बोलणं ऐकून बाप्पानं आपले कान सुपाऐवढे केले. जणू यातलं त्येंना काहीच माहित नाही, असा आव बाप्पांनी चेहर्यावर आणायला सुरूवात केली. तसे मुषकाने वळचणीच्या खिशातून बारका पानपुडा बाहेर काढत त्यातून एक पान काढले. त्याला चुना लावत एक ईडा आपल्या तोंडात सरकावला. बाप्पाला पान हवंय का म्हणत मानेनच इशारा केला. अन् ‘पान खायो सय्या हमारो’ असं हिंदी गाणं गुणगुणत बाहेर ओट्यावरच आपलं फतकलं मांडलं. तसा मुषक पुन्हा बोलाय लागला. ‘यंदा मोदकाची तुम्ही चिंताच करू नका बाप्पा. फक्त मी म्हणेल त्येला “काय चालंलं आमदारसाहेब” असं म्हणून तुम्ही त्येला रामराम करायचा. मग काय नुस्ते मोदकच नाही तर तुम्ही म्हणाल त्यो पदार्थ तुमच्या पुढ्यात आणून नाय दाखविला तर नावाचा मुषक सांगणार नाय…’ मुषकानं जणू बाप्पांसोबत पैजच लावली.
बाप्पाचं अन् मुषकाचं इकडचं तिकडचं बोलणं झालं. हळूच बाप्पानं पुन्हा एक पिल्लू सोडून दिलं. “काय म्हंतेत मग आता जिल्ह्याचे खासदार?” बाप्पाच्या या प्रश्नाबरोबर मुषकाची कळीच खुलली. तोंडातला सगळा मुखरस गट्टकन गिळून मुषकाने तोंड मोकळं केलं. आणि सांगाय सुरूवात केली. “काय सांगावं बाप्पा तुम्हाला.. त्या बप्पाची इस्टोरी. सांगाय गेलो तर तुमी पोटधरून हासाय लागाल. मला तर हसावं की रडावं हे पण समजत नाय कधी कधी” बाप्पाची उत्सुकता ताणत मुषक बोलला.
“अरे पण काय केलंय त्येंनी एवढं की तीनच महिन्यात असं हसू होऊ पाहतंय त्येंचं. बाप्पा बोल्ले.
“कुठली एक गोष्ट म्हणून सांगू… लै भानगडी झाल्याती… गड्याला आपण खासदार झालोत हीच गोष्ट अजून पचनी पडलेली दिसत नै…” खासदारकी म्हंजी काय पत्रावळ्या हायेत का? की कुणीबी यावं अन् मांडी घालून बसावं… आता तर नवंच सोंग आणलंय या माणसानं… तिकिट मागाय आलेल्या लोकास्नी पुसतोय की तुह्या गावात मला मतदान किती? लोकांनी ह्येंन्ला बगून मतदान थोडंच केलं? आंतरवालीत बसलेला ददापा कुणाला तरी पाडाय बसला व्हता नाविलाज म्हणून कुणीतरी निवडला जन्तेनं. त्यात ह्या बप्पाची लॉटरी लागली. ज्येच्यामुळं लॉटरी लागली त्येचा प्रश्न तर निदान देशाच्या मोठ्या सभागृहात मांडायला नको का? तर ह्यो बाबा तिथं त्यो प्रश्न मांडायचा सोडून बीडला इमानतळं पाह्यजे म्हणून अडून बसला. काय तर म्हणं पुणं आमाला 500 किलोमीटर पडतंय. कवानूक ह्येंनी हे अंतर मोजलं त्येंनाच ठावूक. परळीच्या त्या टोकापासून दोनदा मोपलं तरी तितकं भरायचं नाही म्हणतो मी. उगीच वाढून सांगायला त्यो काय गावाचा डांबरीय व्हंय 10 चा 100 करायचा अन् बील काढायचं? आता बीडला इमानतळ व्हायंच्या आगुदर इथं उद्योगधंदे यायला नकोत का? की इथली ‘वासाची लाकडं’ भरून इमानानं दिल्लीला न्यायचीत?” मुषक रागाच्या सुरातच बोलला.
बाप्पा आणि मुषकाची रातभर समद्याच ईशयावर खलबतं झाली. आष्टीपासून ते परळीपर्यंत अन् केजपासून गेवराईपर्यंत… महसूलपासून पोलीसांपर्यंत अन् विविध योजनांपासून ते भ्रष्टाचारापर्यंतच्या सगळ्या गोष्टीची बाप्पांनी मुषकाकडून माहिती घेतली होती. आता गणेश चतुर्थीचा दिवस उगवला. रात्रीच्या जागरणानं मुषक अजून उठलाच नव्हता. इकडं बाप्पांनी निघायच्या आधी देवपुजा सुरू केली. मोठी घंटी वाजवली. शंख फुकला. शंखाच्या आवाजाने मुषकाला जागा आली. तसा तो ताडकन् उठला. झापकन तोंडावर पाणी मारलं. ब्रश करून आंघोळ केली. बाप्पांची पुजाअर्चा होऊस्तोवरतर मुषक रेडी झाला होता. बाप्पांनी मुषकावर स्वार होत त्याला चालण्याची आज्ञा केली. तसे दोघांचेही पृथ्वीच्या दिशेने प्रस्थान सुरू झाले.