a-corona1

पोलीस कोठडीतील आरोपी कोरोना पॉझिटीव्ह

कोरोना अपडेट क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

बीड ग्रामीण, स्थानिक गुन्हे शाखा,
बीड शहर पोलीस आले होते संपर्कात

बीड  :  दरोड्याच्या तयारीत असलेला आरोपी बीड ग्रामीण पोलीसांनी पकडला होता. आरोपीला न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर त्याचा स्वॅब घेण्यात आला होता. यामध्ये त्याचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यामुळे एकच खळबळ उडाली. या आरोपीच्या संपर्कातील लोकांचे स्वॅब पाठवण्यात येणार आहेत.

      बीड तालुक्यातील माळपुरी शिवारामध्ये दरोड्याच्या तयारीत असलेली दरोडेखोरांची टोळी बीड ग्रामीण पोलीसांनी दि.मंगळवारी (दि.14) गजाआड केली होती. पाच आरोपीमध्ये एक अल्पवयीन आरोपीचा समावेश होता. चार आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. या दरम्यान हे आरोपी बीड ग्रामीण पोलीसांसह स्थानिक गुन्हे शाखा, बीड शहर पोलीस यांच्या संपर्कात आले होते. न्यायालयाने शनिवारी (दि.18) त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे या चौघांचे स्वॅब घेण्यात आले. सोमवारी (दि.20) कोरोना तपासणी अहवाल आल्यानंतर यातील एक आरोपी पॉझिटीव्ह तर तिघे निगेटिव्ह आले. एक आरोपी पॉझिटीव्ह आढळल्यामुळे मोठी चिंता वाढली आहे. कारण हा आरोपी अनेकांच्या संपर्कात आलेला आहे.

बीड ग्रामीण, एलसीबी, बीड
शहर पोलीसांचे स्वॅब पाठवणार
सदरील आरोपी हा बीड ग्रामीण पोलीसांनी दरोड्याच्या तयारीत असताना पकडला होता. त्यानंतर त्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या स्वाधीन करण्यात आले. त्यांनी तपासानंतर त्यास बीड शहर पोलीस ठाणे येथील लॉकअपमध्ये ठेवण्यात आले. या दरम्यान पाच दिवसाच्या कालावधीमध्ये हा आरोपी बीड ग्रामीण, एलसीबी, बीड शहर पोलीस व लॉकअपमधील आरोपी व तेथील गार्ड यांच्या संपर्कात आलेला आहे. त्यामुळे येथील पोलीस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड, आरोपी यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे.

अधिकारी, कर्मचारी क्वारंटाईन
सदरील आरोपी हा पॉझिटीव्ह आल्याचे समजताच त्याच्या संपर्कात आलेले बीड शहर, बीड ग्रामीण, स्थानिक गुन्हे शाखा येथील अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

Tagged