चार दिवसांनंतर अंमळनेर पोलिसात गुन्हा नोंद
पाटोदा, दि.13 : पाटोदा तालुक्यातील कारेगाव अंतर्गत कठाळवाडी येथील अल्पवयीन मुलीवर लग्नासाठी दमबाजी करीत आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. यासंदर्भात चार दिवसांनंतर अंमळनेर पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
कठाळवाडी येथील अकरावीच्या वर्गात शिकणार्या विद्या गौत्तम कठाळे (वय 17) या अल्पवयीन मुलीने दि 8 ऑगस्ट रोजी विष प्राशन केले होते. उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात 9 ऑगस्ट रोजी तिचे निधन झाले. तेव्हापासून मुलीच्या आई व वडिलांनी संशय व्यक्त केला होता. मात्र पोलिसांनी शवविच्छेदन अहवालानुसार अकस्मात गुन्हा नोंद केला होता. मात्र आई वडिलांनी न्यायासाठी पोलिस ठाण्यातच ठाण मांडले. अंमळनेर पोलिसांनी कठाळवाडी येथिल घटनास्थळाचा पंचनामा करून तसेच मोबाईल लोकेशन व कॉल डिटेल तपासले. चार दिवसांनंतर अंमळनेर पोलिसांनी पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून तीन तरुणां विरोधात गुन्हा दाखल करून घेतला आहे. मुलीच्या आईने फिर्यादित म्हटले आहे की, शिरुर तालुक्यातील कान्होबाची वाडी येथील तरुण हा विद्या हिस लग्नासाठी दबाव टाकत दमबाजी करीत होते. याचा त्रास सहन न झाल्याने विद्याने आत्महत्या केली आहे. या फिर्यादीवरून आरोपी विरोधात चार दिवसानंतर भादंवी 305, 354 (ब), 34/12 पोक्सो कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या अल्पवयीन मुलींवर मानसिक अत्याचार करणारे हे तिचे नातेवाईक तरुण आहेत. विद्या ही हुशार मुलगी होती. तिला बारावीच्या नंतरही शिकायचे होते. तिचे वडिल हे रेल्वेच्या कामावर धारुर तालुक्यात असतात तर आई शेतात असते. हे आरोपी सततच तिला मानसिक त्रास देऊन लग्नासाठी दमबाजी करीत होते. याची वाच्यता मुलीने आईजवळ केली होती. मात्र या तरुणांनी मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केले असा आरोप मुलीचे मामा, आई वडिल यांनी केला होता. पुढील तपास पोलिस निरीक्षक श्यामकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार अमण सिरसाट व जमादार काकडे हे करत आहेत.
