वैजेनाथ घायतिडक, गणेश मारगुडे । माजलगाव
दि.19 : बचावकार्या दरम्यान माजलगाव धरणातील पाण्यात सकाळी 10 वाजून 10 मिनिटांनी उतरलेल्या आणि नंतर बेपत्ता झालेल्या जवानाच्या बचावासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरू होते मात्र आता हे प्रयत्न फोल ठरले आहेत. पाण्याखाली बेपत्ता झालेल्या जवानाला स्थानिक मच्छिमार महिलांनी दुपारी सव्वा एकच्या सुमारास गळ लावून वर काढले. धरणकाठी जवानाची तपासणी करून बचाव पथकातील डॉक्टरांनी या जवानास मयत घोषित केले. त्यानंतर या जवानाचा मृतदेह येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. इथेही या जवानास तपासून मयत घोषित करण्यात आले. राजशेखर प्रकार मोरे 30 रा. कोल्हापूर असे त्या मयत जवानाचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
तेलगाव येथील डॉ. दत्तात्रय फपाळ यांचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी बीड, परळी, येथील आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी 24 तासापासून प्रयत्न करीत होते. अद्यापही त्यांचा मृतदेह हाती लागलेला नाही. आज त्यांच्या मदतीला कोल्हापूर येथील एनडीआरएफची टीम धावून आली. या टिमने शोधकार्य सुरू केले. मात्र धरणात मच्छिमारांनी लावलेल्या जाळ्यात अडकून टीममधील दोन सदस्य पाण्याखाली अडकून पडले. त्यांना बाहेर काढताना झालेल्या खेचाखेचीत राजू मोरे यांचा ऑक्सिजन सिलींडर निसटून वर आला. साधारण अडीच तासाच्या अथक प्रयत्नानंतर त्यांचा मृतदेहच बचाव पथकाच्या हाताला लागल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
तर बचावलेल्या दुसर्या एका शुभम काटकर या कर्मचार्याला 15 मिनिटानंतर बीडच्या बचाव पथकाने वर काढले. त्याच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती उपचार करणार्या देशपांडे हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिली.
घटनास्थळी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, उपविभागीय अधिकारी निलम बाफना, तहसीलदार वर्षा मनाळे, मुख्याधिकारी विशाल भोसले, माजलगाव शहर पोलीस ठाण मांडून आहेत. शहरातील नागरिकही मोठ्या प्रमाणावर माजलगाव धरणावर दाखल झालेले आहेत.