उसण्या पैशाला तगादा लावल्याने अपहरण करुन तरुणास मारहाण

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड माजलगाव


दोघांविरुद्ध गुन्हा दाखल; माजलगाव शहरातील घटना
माजलगाव दि.12 ः. उसने घेतलेले पैसे मागण्याचा तगादा का लावला या कारणाने एका 24 वर्षीय मजुर युवकाला सिनेस्टाईल अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना बुधवार, 10 रोजी रात्रीच्या दरम्यान शहरापासून जवळ असणार्‍या एमआयडीसी भागात घडली. दरम्यान या प्रकरणातील दोघांविरुद्ध शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, सिंदफणा एक्वा वाटर प्लांटवर मजुरी करणार्‍या आप्पाराव दत्ता श्रीखंडे (वय 24, रा.मनुरवाडी) या युवकाकडून त्याचे मित्र असीम आतिक पठाण, शेख सुजात शकील यांनी उसने पैसे म्हणून 40 हजार रुपये घेतले होते. श्रीखंडे याने म्हैस विकून ते पैसे त्यांना दिले होते. दरम्यान बहिणीच्या लग्नासाठी श्रीखंडे याला पैशाची गरज असल्याने तो त्या दोन मित्रांना पैशाची सतत मागणी करू लागला. परंतु असीम आणि सुजातकडून चालढकल होत असल्याने श्रीखंडे याने हा प्रकार त्याचे मालक सय्यद जमील सय्यद नबी यांना सांगितला. पैसे घेतलेले कोणालाही का सांगत आहेस, आमची बदनामी करत आहेस, याचा राग मनात धरत असीम आणि सुजात याने आप्पाराव श्रीखंडे यास एमआयडीसी मधून आमचे पैसे मिळणार आहेत तू आमच्या सोबत चल. असे म्हणत त्याला जबरदस्तीने बुधवार, 10 रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या दरम्यान एमआयडीसीमध्ये नेले व धारदार स्क्रूड्रायव्हरने, लोखंडी रॉडने जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला. हातावर व मानेवर मार झेलत श्रीखंडे याने तिथून पळ काढला. यावेळी श्रीखंडे रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग करत असलेल्या पोलीस वाहनाच्या साह्याने माजलगाव ग्रामीण पोलीस ठाणे गाठले. दरम्यान गुरुवारी असीम आतिक पटेल (रा.सय्यद गल्ली), शेख सुजात शकील (रा.सय्यद गल्ली) यांचे विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात अप्पाराव दत्ता श्रीखंडे यांच्या फिर्यादीवरून कलम 307, 326, 394, 367, 324 (34) भादविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाच्या पुढील तपास निरीक्षक शितलकुमार बल्लाळ करत असून आरोपी अद्याप फरार आहेत.

Tagged