सिरसाळा दि.12 ः पान टपरीवर पुडी घेण्यासाठी जात असताना अंगाला धक्का लागला म्हणून दोघात वाद झाला. हा वाद एवढा टोकाला गेला की, यात एकाचा बळी गेला. ही धक्कादायक घटना परळी तालुक्यातील सिरसाळा येथे घडली असून स्वतः आरोपीने पोलीस ठाण्यात हजर होवून खून केल्याची कबुली दिली आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भुजंग वाघमारे (वय 30, रा.परळी) हे चार वर्षापूर्वी सिरसाळा येथून परळीकडे जात होते. यावेळी सिरसाळा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात एका अज्ञात व्यक्तीचा अंगाला धक्का लागला. यावरुन वाद निर्माण झाला व भुषण वाघमारे यास शिवीगाळ केली. याचा राग आल्याने सदरील तरुणाच्या डोक्यात वाघमारे यांनी लाकडी काठी घातली. यात तो बेशुद्ध होवून खाली कोसळला. त्यानंतर वाघमारेंनी त्यास रस्त्याच्या बाजूला असलेल्या महावितरण कंपनीच्या जुन्या इमारतीतील दुसर्या मजल्यावरील खोलीत नेवून टाकले. हा बेशुद्ध पडला असून सकाळी शुद्धीवर येईल, असे वाटल्याने तिथेच सोडून वाघमारे निघून गेले. तब्बल चार महिन्यानंतर पुन्हा इमरतीत जावून वाघमारे यांनी पाहिले तर सदरील इसमाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. घडलेली सर्व हकीकत सिरसाळा पोलीस ठाण्यात जावून वाघमारे यांनी दिली. मयताची ओळख पटलेली नसून सिरसाळा पोलीस अधिक तपास करत आहेत.