धारुर दि.12: धारुर शहरातून गेलेला खामगाव पंढरपूर हा महामार्ग दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. धारुर- माजलगाव दरम्यान या रस्त्यात अनेक ठिकाणी मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. तालुक्यातील आंबेवडगाव परिसरात अज्ञात वाहनाने बुधवारी (दि.12) दुपारी दोन दुचाकीस्वारांना जोराची धडक दिली. यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसर्याचा उपचारासाठी रुग्णालयात घेवून जात असताना मृत्यू झाला.
अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील पंडित सुतारे (वय 38) यांचा जागीच मृत्यू झाला. तर अनिल अडागळे हे गंभीर जखमी होते. त्यांना उपचारासाठी डॉ.अरविंद निक्ते, सुरज सावंत यांनी रुग्णवाहिकेतून तातडीने धारुर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तिथे प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी स्वारातीत घेवून जात असताना वाटेतच अडागळे यांचा मृत्यू झाला. या महामार्गावर अपघाताच्या घटनात वाढ झाली असून त्याला रस्त्यावर पडलेले खड्डे जबाबदार आहेत. आणखी कितीजणांचे बळी गेल्यावर या रस्त्यावरील खड्डे बुजवले जाणार आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.