आरोपी मुलगा अटकेत, बीड शहरातील घटना
बीड दि.19 ः एकुलता एक असलेल्या मुलाला आई-वडीलांनी डॉक्टर बनवले. मात्र पुढे एमडीचे शिक्षण घेताना त्यास अपयश आले. त्यामुळे डोक्यावर परिणाम झाल्याने वेडसर वागू लागाला. त्यावर उपचारासाठी आई-वडीलांनी खुप प्रयत्न केले मात्र त्यांनाही अपयश आले. या वेडसर असलेल्या डॉक्टर मुलाने वडीलांच्या डोक्यात लोखंडी खलबत्या घालून त्यांचा खून केला. ही धक्कादायक घटना बीड शहरातील अंकुशनगर भागात मंगळवारी (दि.18) रात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीसात आरोपी मुलावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तो अटकेत असून अधिक तपास पोलीस करत आहेत.
सुरेश काशीनाथराव कुलकर्णी (वय 70, रा.साईपंढरी अंकुशनगर बीड) असे मयताचे नाव आहे. मयताची पत्नी सुरेखा सुरेश कुलकर्णी यांनी शिवाजीनगर पोलीसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पती कृषी विभागात नोकरीस होते, 2002 मध्ये सेवानिवृत्त झाले. त्यांच्या पेन्शनवर कुटूंबाचा उदनिर्वाह चालतो. मुलगा सुधीर कुलकर्णी हा अविवाहित असून 2010 मध्ये त्याचे बीएएमएसचे शिक्षण पूर्ण झालेले असून एम.डी.चे तीन वर्ष शिक्षण घेतले परंतू त्यात तो नापास झाला. तेव्हापासून तो वेडसरपणाने वागू लागला. त्याला खाजगी रुग्णालयात प्रॅक्टीससाठी पाठवले परंतू त्याने व्यवस्थित ड्युटी केली नाही. तो अधिकच वेडसर वागू लागला, म्हणून त्यावर उपचारासाठी सोलापुर येथील आधार हॉस्पीटल, बीड जिल्हा रुग्णालय, बीड येथील डॉ.पाटणकर, लातूर येथील पोतदार हॉस्पीटल, बीड येथील डॉ.बागलाने यांच्याकडे वेडसरपणावर उपचार घेतले. मात्र त्यामध्ये काहीही बदल झाला नाही. त्यास गोळ्या औषध सुरुच होते. मागील तीन वर्षापासून तो अधिकच वेडसर वागू लागला, अंगावर कपडे न घालता गल्लीत फिरायचा, सर्वांना त्याच्यामुळे त्रास व्हायचा, तसेच वडीलांनाही तो कधीकधी मारहाण करायचा. अशातच मंगळवार, 18 जुलै रोजी रात्री घरात देवाची आरती केली. वडीलांनी त्यास आरती घेण्यास सांगितले, त्यावर त्याने मला कशाची आरती देतो, कापूर उदबत्ती लावतो असे म्हणत घरातील लोखंडी खलबत्यातील बत्याने डोक्यात मारले, आणि घरातून निघून गेला. सुरेश कुलकर्णी हे डोक्यात जोराचा मार लागल्याने खाली कोसळले, शेजारील नागरिकांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मयताच्या पत्नी सुरेखा कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरुन शिवाजीनगर पोलीसात मुलगा सुधीर कुलकर्णीवर गुन्हा दाखल करण्यात आला, तो अटकेत असून अधिक तपास पोलीस करत आहेत.