म्हाळस पिंपळगाव येथील पथकाच्या कारवाईनंतर अवैध वाळू उपसा बंद!

बीड

सुसाट धावणार्‍या हायवा गल्लीबोळात घुसल्या
गेवराई दि.21 : महसूल प्रशासनासह स्थानिक पोलीसांच्या दुर्लक्षपणामुळे अवैध वाळू उपसा सुसाट वेगाने सुरु आहे. विशेष पथकाचे प्रमुख सहायक निरीक्षक गणेश मुंडे व त्यांच्या टिमने मंगळवारी (दि.21) गोदापात्रात छापा टाकत जवळपास 75 लाखांचा वाळूसाठा जप्त केला. त्यानंतर दुसर्‍या दिवशी अवैध वाळू उपसा बंद झाल्याचे दिसत आहे, सुसाट धावणार्‍या हायवा कुठल्या गल्लीत बोळात गेल्या? यासह अवैध वाळू उपसा किती दिवस बंद राहील असा प्रश्न उपस्थित होत आहे.

गेवराई तालुक्यातील म्हाळस पिंपळगाव येथे गोदापात्रातून अवैध वाळू उपसा सुरु असून मोठ्या प्रमाणात वाळूसाठा केला असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख सहायक निरीक्षक गणेश मुंडे यांनी छापा मारला. यावेळी जवळपास 2400 ब्रास वाळू ज्याची साधारण किंमत जवळपास 75 लाखांच्या घरात आहे. हा वाळूसाठा जप्त करुन महसूल विभागाच्या स्वाधीन करण्यात आला आहे. ही कारवाई गणेश मुंडे, विष्णू वायबसे, स्वाती मुंडे यांच्यासह राखीव दलाच्या कर्मचार्‍यांनी केली होती.

एसपींच्या विशेष पथकाची चढाओढ
कारवायासाठी व्हावी वसूलीसाठी नव्हे

जिल्हाभरातील अवैध धंद्यांवर कारवाया व्हाव्यात या हेतूने विशेष पथकाची स्थापना केली जाते. विशेष पथकाच्या माध्यमातून यापुर्वीही मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यांवर कारवाया झालेल्या आहेत. परंतू एसपींनी मध्येच काही अधिकार्‍यांना पाठवून अवैध धंद्यांवर कारवाया केल्या. यातील काहींनी पथकाचा धाक दाखवून वाळू माफियांकडून वसुली केल्याची चर्चा आहे. त्यामुळे विशेष पथक म्हणून पाठवलेल्या पथकाची कारवाायासाठी चढाओढ लागावी फक्त वसुलीसाठी नाही अशी चर्चा होत आहे.