माँसाहेब जिजाऊ मल्टीस्टेटचा फरारव्यवस्थापक मधुकर वाघीरे पकडला!

बीड


आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई; आज न्यायालयात करणार हजर
केशव कदम- बीड

माँसाहेब जिजाऊ मल्टीस्टेटने जिल्ह्यातील अनेकांना कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी शिवाजीनगर, नेकनूरसह इतर ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करत असून नेकनूर ठाण्यातील गुन्ह्यात फरार असलेल्या व्यवस्थापकास रविवारी (दि.3) दुपारी ताब्यात घेतले. त्यास आज सोमवारी न्यायालयात हजर करणार आहेत. (beed masaheb jijau multistate news)

मधूकर बन्सी वाघीरे (वय 43 रा.उदंड वडगाव ता.बीड) असे आरोपीचे नाव आहे. वाघीरे हा नेकनूर येथील माँसाहेब मल्टीस्टेटच्या शाखेत व्यवस्थापक होता. या शाखेतील ठेवीदारांना ठेवी परत न मिळाल्यामुळे संचालक मंडळावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून वाघीरे फरार होता. रविवारी तो मांजरसुंबा परिसरात आल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक हरिभाऊ खाडे यांना मिळाली. त्यांनी त्यास ताब्यात घेतले असून आज सोमवारी न्यायालयात हजर करणार आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सचिन पांडकर, उपअधीक्षक संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक हरिभाऊ खाडे, सहायक उपनिरीक्षक जाधवर, बहिरवाळ, भालेराव यांनी केली.

आतापर्यंत पाच जणांना अटक;
मास्टरमाईंड बबन शिंदे महत्वाचा

माँसाहेब जिजाऊ मल्टीस्टेटचा घोटाळा 200 कोटींच्या घरात आहे. याप्रकरणी शिवाजीनगर, नेकनूरसह धाराशिव जिल्ह्यात गुन्हे दाखल आहेत. दरम्यान आर्थिक गुन्हे शाखेकडे 1800 तक्रारी आल्या असून रक्कम 102 कोटी आहे. आतापर्यंत अनिता शिंदे, योगेश करांडे, भारत सावंत, सुदाम काळे यांना अटक केलेली असून करांडेंना जामीन झालेली आहे. तर मुख्य आरोपी बबन शिंदे, मनिष शिंदे, अश्विनी वांढरे हे फरार आहेत. यातील बबन शिंदे हा मास्टरमाईंड असून जोपर्यंत शिंदेला अटक होणार नाही, तोपर्यंत या प्रकरणाचा उलगडा पोलीसांना होणार नाही.

नेकनूर ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील व्यवस्थापक वाघीरेला अटक केली आहे. त्याकडून या गुन्ह्याबाबत मोठ्या प्रमाणात माहिती मिळेल. तसेच इतर फरार आरोपींचाही शोध सुुरु आहे.
-पोनि.हरिभाऊ खाडे, आर्थिक गुन्हे शाखा, बीड

Tagged