17 दिवसांनंतर जरांगे पाटलांचे उपोषण स्थगित तर साखळी उपोषणाची घोषणा!

बीड

उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात दाखल
बीड दि.26 ः सगेसोयर्‍यांची अंमलबजावणी करावी, यासह इतर मागण्यांसाठी  गेल्या 17 दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटीत बेमुदत आमरण उपोषण सुरु होते. सोमवारी (दि.26) दुपारी अंतरवाली सराटीतील माता महिलांच्या हस्ते पाणी घेवून त्यांनी हे उपोषण स्थगित केले. तसेच साखळी उपोषणची घोषणा यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केली.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या अनेक महिन्यांपासून कधी आंदोलन तर कधी उपोषणाचा मार्ग स्वीकारणारे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. रविवारी आंतरवली सराटीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण न मिळण्यामागे देवेंद्र फडणवीसच असल्याचा दावा जरांगे पाटील यांनी केला होता. त्यापाठोपाठ त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर जाऊन आंदोलन करण्याचा इशारा देत आक्रमक भूमिका घेत ते सागर बंगल्याकडे जाण्यासाठी निघाले होते. लाखोंच्या संख्येने समाजबांधव त्यांच्या मागे मुंबईकडे रवाना झाला होते. भांबेरी येथे रात्रीचा मुक्काम केल्यानंतर सकाळी मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडल्यामुळे ते आंतरवली सराटीमध्ये परतले. आज सोमवारी दुपारी त्यांनी बेमुदत उपोषण स्थगित करत असल्याचे जाहीर केले. आणि पुढे साखळी उपोषण सुरु राहणार असल्याचे सांगितले. उपचारासाठी जरांगे पाटील यांना छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सगेसोयरेसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी
काढलेल्या अधिसूचनेचं पालन करावे

मराठ्यांना स्वतंत्र 10 टक्के आरक्षण देणारा कायदा राज्य सरकारने मंजूर केला. मात्र, ओबीसी कोट्यातूनच मराठ्यांना आरक्षण मिळायला हवं, स्वतंत्र आरक्षण कायद्याच्या चौकटीत टिकणार नाही, अशी ठाम भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली. तसेच, सगेसोयरेसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी काढलेल्या अधिसूचनेचं पालन केलं जावं, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. मात्र, सरकारमधील सगळे निर्णय देवेंद्र फडणवीसच घेत असून यामागेही त्यांचाच हात असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
—————- 

Tagged