पंतप्रधान मोदींपुढे कोरोना व्यतिरिक्त आणखी चार मोठी आव्हाने!

देश विदेश

दिल्ली: देशात एकीकडे कोरोनासारखा अदृश्य शत्रू दबा धरून बसलेला असताना, दुसरीकडे भारतापुढे शेजारी मित्र आणि जुने शत्रू यांच्याशी दोन हात करण्याची वेळ आली आहे. कोरोना सोडून अजून कोणत्या संकटांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तोंड द्यावं लागणार आहे, हे जाणून घेऊया.

देशात कोरोनाचा कहर

देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन लाखांचा टप्पा पार केला आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशभरात कोरोनाचे तब्बल 10,974 नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनामुळे 11903 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आता भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 3,54,065 वर पोहोचली आहे.

अर्थव्यवस्थेचं संकट

कोरोनामुळे देश मार्च पासून लॉक डाऊन आहे. त्यातून, देशातील अर्थव्यवस्था सर्व उद्योगधंदे बंद असल्या कारणाने खचलेली आहे. हे अर्थव्यवस्थेचं चाक चिखलातून वर काढणं गरजेचं होऊन बसलं आहे परंतु, कोरोनाचा वाढत चाललेला प्रादुर्भाव बघता ते लवकर होणं शक्य वाटत नाही.

चीन बरोबर सीमेवर संघर्ष

चीनसोबत झालेल्या संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले आहेत. गेल्या पाच आठवड्यांत पॅनगाँग सरोवर, गलवान खोरे, दौलत बेग औल्डी आदी भागांवरून दोन्ही सैन्यांमध्ये तणाव निर्माण झाला होता. चीनने सीमेवरील लष्कर वाढवल्यानंतर भारतानेही वाढवल. परंतु नंतर लष्करी व राजनैतिक पातळीवर चर्चा होऊन सैन्य माघारीवर सहमती झाली. मात्र, सीमेवर आणलेले जास्तीचे 10 हजाराचे सैन्य वादरेषेच्या मागे घेण्यास चीन टाळाटाळ करत असल्यावरून पुन्हा वादाचे मुद्दे उपस्थित होत आहेत.

नेपाळ बरोबर संबंधात कटुता

एकीकडे पाकिस्तान आणि चीन सीमेवर नवीन नवीन कुरापती करत असताना आता भारताचा मित्र देश नेपाळ देखील कुरबुरी काढत आहे. नेपाळने भारताचा काही भाग आपल्या नकाशात समाविष्ट करून टाकला आहे. त्यामुळे दोन देशांत भविष्यात तणाव निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.

पाकिस्तानचं भिजत घोंगडं!

सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती नेहमीप्रमाणे दिवसेंदिवस वाढत आहेत. तसेच पाकिस्तानातील भारतीय राजदूतावासात काम करीत असलेले दोन भारतीय कर्मचारी सोमवारी ड्युटीसाठी बाहेर पडल्यापासून गायब झाल्याने खळबळ उडाली होती. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पाकच्या भारताच्या दूतावासातील अधिकाऱ्याला सज्जड दम भरून जाब विचारताच या दोन भारतीयांना सोडून देण्यात आले आहे.

Tagged