MUSHAK

हाबाडा कोण देणार?

बीड

रमेश्र्राव हाबाडा रस्त्याच्या कडेला एकटेच बसले होते. दोन पायाच्या मध्ये मुंडकं अडकवून मातीवर काडीने काहीतरी खरडत होते. मुषकाची नजर त्यांच्यावर गेली. तसा मुषकाने त्यांना आवाज दिला. “ओ हाबाडा, या की हिकडं. काय तुमचं सुखदूख असेल तर म्होरं होऊन सांगा बाप्पास्नी”

मुषकानं आवाज दिल्याबरोबर हाबाडा बाप्पांच्या जवळ गेले आणि आपली दर्दभरी कहाणी सांगू लागले. “मागच्या बारी 12 हजारानी शीट गेली. याबारी निदान 12 मतानी का व्हायना पण यायला पाह्यजे. आमचे अनेक दोस्त आमदार झाले. इतकंच काय आमचा कार्यकर्ता असलेला बज्या (जबरंग) पण खासदार झाला. बाप्पा याबारी तरी नंबर लागू दे आमचा. कव्हरूक कार्यकर्ते संभाळावीत. आता तर इलेक्शन लांबणार है म्हणं. त्यानं तर अवसानच गळून गेलंय. पाय पण वाकाय लागलेत. भाजपवाले काय तिकट देत नैत… तवा तुतारी फुकू… तुतारीवाले नाय मनले तर फुकारी आणू… नाय तर बच्चू कडूच्या पक्षाचं तिकिट आणू, बच्चूनी नाय दिलं तर तैसीलच्या भायेर कोणता पक्षा एबी फॉर्म देईल त्याचा फॉम जोडू पण यंदा आमदारच व्हायचंचय मला”

हाबाडा मास्तरचं बोलणं मध्येच थांबवत मवनकुमार उठले. तुमी तुतारीचं नाव पण काढू नका. तुतारी आपुन बूक करून आलोत. जबरंगीची आपल्याला शिफारस है. गेल्या आठ दिसापासून ‘मॉर्निंग वॉक’ सुरू केलाय. खोटं वाटत असेन तर इच्चारा यादवाच्या शरदला. त्यामुळं यंदाच्या बारी आता फक्त तुतारी… अन् तुतारी नायच भेटली तर मग ‘सुपारी’. तवा बाप्पा आशीर्वादाचा हात आमच्या टकुर्‍यावरून सरकू देवू नका.

“उपर्‍या लोकांना हिथं एन्ट्री नाय…” म्हणत दोघांच्या भांडणात आता नारायण बदक यांची एन्ट्री झाली. “बाप्पा हे दोघंबी उपरेच हायेत. आमची लई दिसापासून उपेक्षा झालीय. पवार सायेबांच्या वाट्याला आलेलं दुख आता आमाला सहन नै होत. आमदारकीचं कै पण व्हईन पण ह्या वयात पवार सायेबांना झालेले कष्ट नाय सैन व्हत. इधानसभेचा प्रमुख म्हणून पैला अधिकार मवा हाय. एकबार जंग लढविण्याचा अनुभव पण हाय”

नारायणरावांना खाली बसवत भाई धावरें बोलायला लागले. “ओ नारायणराव, ते दोघं उपरे अन् तुमी कोण? धामनगावहून इथं येऊन तुमचा बाप आमदार झाला. तवा त्यो उपराच व्हता. आता सोन्नाथडी, छोटवाडी, मोठवाडीला जमीनी घेतल्या म्हणून तुम्ही इथले वतनदार थोडेच झालात. बाप्पा माझा संघर्ष किती हाये अन् कसा हाये हे हिथल्या बारक्या बारक्या पोराला पण मालूम हाय. माझ्या मागं कार्यकर्ते असोत की नसोत तुमचा आशीर्वाद मात्र मलाय हवाय”

भाई धावरेंचं बोलणं होत नाय तोच मिशावर ताव मारत आण्णा उठले. “बाप्पा आतापस्तोर सगळ्यांचं ऐकलं. पण मी हिथला खरा वतनदार हाय. मप्ल्याकडं माजलगावची पाटीलकी हाय. एकबारीनं आमदारकी जितलेली हाय. एकबारीनं बाजार समितीचं सभापतीपद मप्ल्याकडं व्हंतं. माझी इच्छाय एकदा सोळंक्यांना आस्मान दाखवायची. भाईत ती धमक नाय. तवा तुमचा आशीर्वाद मलाच मिळावा, अशी आपल्या चरणी प्रार्थना हाय”

ह्या सगळ्यांचं मुषकानं बारीक बारीक टिपण घेतलं. बाप्पांकडं कटाक्ष टाकला. बाप्पानं त्याला पुढचा ईशय घेण्याचं फर्मान सोडलं. त्यावर मुषक म्हणाले, तुतारीकडून लढायची इच्छा असलेले संपले का? आता अपक्ष लढायची इच्छा असलेले पुढे या… मुषकानं आज्ञा केल्याबरूबर खांद्यावरची घोंगडी बाजुला सारत एका व्यक्तीने बाप्पांच्या पायावर तैलाभिषेक करायला सुरूवात केली. अत्यंत निर्मळ मनाने नर्मदेची शपथ घेवून आपल्या पायावर डोकं ठेवून सांगतो की मला कुठल्याही पक्षाकडून लढण्यास अजिबात इंट्रेस नाई. पण तरीबी प्रोटोकॉल म्हणून मी घड्याळीकडे तिकिट मागतोय. आपल्याला तिकिट नाय दिलं तरीबी आपली काय शिकायत नाय. पण यंदा धनगर खवळलाय. आपल्या पाठीवर परळीच्या बहीण भावाचा हाथ हाय. त्यामुळं वंजारा मतं मलाच मिळणार अशी आशा हाय” तोच मागून मुक्तीराम ओरडला, धनगर म्हणजे तुमची जहागिरी नाय. आमच्या जानकार सायेबांचा फूटू पण तुमी वापरायचा नाय… तसा आदेशय सायेबांचा…

मुक्तीरामला खाली खेचत डाबरी मुंडे उठले. “तात्या तुम्ही फक्त धनगरांपुरतं बोलायचं. वंजार्‍यांचं काय ते मी बघून घेईल. अन् परळीच्या सायबांसाठी अन् तायसायबांसाठी आम्ही लै खस्ता खाल्ल्यात. त्यामुळे त्येंन्चा आशीर्वाद फक्त ह्या डाबरीच्या डोक्यावर है. बाप्पा फक्त एक चानस द्या. नाय सगळ्यांचा टांगा पल्टी करून ठिवला तर नावाचा डाबरी सांगायचो नाय. तिकिटाचा म्हणाल तर तिकडं प्रकाश आंबेडकरांचे जावून पाय धरू. पण आवंदा तुतारीचा भुगाच करू.”

अजून कोण कोण र्‍हायले म्हणत मुषकाने पुन्हा पुकार केली. त्यावर डॉ. सुरेश्र्राव शाबळे उठले. ते म्हणाले कुणाचं कायच खरं नस्तानाबी त्येंना आमदारकीची सप्नं पडायला लागलीत. माझ्याकडं तर कुणाचं कसं आपरेशन करायचं ह्यांची सगळीच कला हाय. पण आम्ही आमदारकी लढायची म्हटलं की कुणीतरी धारूरात बसून आमचं ‘ऑक्सिजन’ लेवल कमी जास्त करतंय. त्यामुळे दम धरवत नाय. आता दुसरी तिसरी काय इच्छा नाय पण म्होरच्या सरकारमधी त्यो तानाजी आरोग्यमंत्री काय पण साधा आमदार पण नाय पाह्यजे बगा”

डॉक्टरसायेबांचं बोलणं संपताच नितीन पाईकनवरे, अरुण रौत, बेहाल चाऊस ह्यांनी देखील आपलं म्हणणं मांडलं. बाप्पांच्या आज्ञेनंतर मुषक बोलायला उठले.

“हे पहा आमच्या मागं रातंर कमी अन् साेंंगं जास्तंयत. आंतरवालीच्या मावळ्यांचं काय म्हणणंय ते आमी रस्त्यात ऐकू. बाप्पाला तुमी सगळे सारखेच हैत. कुणाला कमी अन् कुणाला जास्ती आशीर्वाद अस्सं होण्णार नाय. पण तुम्ही काळजी करू नका. माजलगावचा माहौल सोळंक्यांना घरी बसवायचं हे अंधूक नाय तर ठळक दिस्तोंय. फक्त ‘हाबाडा’ कोणी द्यायचा येवढाच प्रश्नंय… त्यामुळं सगळे जरा सबुरीनं घ्या एवढंच ह्या ठिकाणी सांगतोय.

  • बालाजी मारगुडे, बीड
    मो. 9404350898
    मुषकराज पर्व 5 वे भाग 5

Tagged