majalgaon nagar parishad

नगराध्यक्ष चाऊस यांची जागा जिल्हाधिकार्‍यांनी केली रिक्त

बीड माजलगाव राजकारण

माजलगाव नगर परिषद प्रकरण

बीड, दि.30 : जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षपदावर गदा येण्याचं पहिलं प्रकरण माजलगाव नगर परिषदेत घडले आहे. येथील नगराध्यक्ष सहाल चाऊस हे 17 मार्चपासून एका भ्रष्टाचार प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असल्याने हे पद जिल्हाधिकार्‍यांनी रिक्त घोषित केले आहे. माजलगाव नगर परिषदेच्या मुख्याधिकार्‍यांना याबाबत आदेश पाठविण्यात आले असून त्यांनी रिक्त झालेल्या जागेबाबत निवडणूक आयोगाला कळवावे, असेही आदेशात म्हटलेले आहे. माजलगाव नगर परिषद बरखास्त करण्यासाठी आ.प्रकाश सोळंके यांनी आपली राजकीय प्रतिष्ठा पणाला लावली होती.  

माजलगावचे नगराध्यक्ष सहाल चाऊस यांच्याविरोधात माजलगाव नगर परिषदेतील नगरसेवकांनी जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्या अविश्वासाचा प्रस्ताव दाखल केलेला होता. जिल्हाधिकार्‍यांनी विशेष सर्वसाधारण सभा देखील बोलावली होती. मात्र जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षावर असा अविश्वास आणता येत नसल्याचे आदेश चाऊस यांनी औरंगाबाद खंडपीठाकडून आणले. त्यानंतर ही सभाच रद्द झाली.


उपनगराध्यक्ष सुमन मुंडे यांनी 27 मे रोजी जिल्हाधिकार्‍यांकडे अर्ज करून नगराध्यक्षपदाचा पदभार उपनगराध्यक्षांकडे देण्याची मागणी केली होती. त्यात त्यांनी नगराध्यक्ष 4 मार्चपासून अटक असल्याचे कारण दिले होते. महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायत अधिनियम 1965 चे कलम 56 (1), (2), (3), या कलमांचा आधार घेण्यात आला. शिवाय कलम 57 (2) नुसार पदाचा पदभार उपनगराध्यक्षांकडे देण्याची विनंती मुंडे यांनी केली होती. त्यानुसार जिल्हाधिकार्‍यांनी मुंडे यांचा अर्ज तत्वतः मान्य केल्याचे म्हटले आहे. मात्र नगराध्यक्षपदाचा पदभार उपनगराध्यक्षांकडे देण्यात यावा असे आदेशात स्पष्टपणे म्हटलेले नाही. तर हे पद रिक्त असल्याचे जाहीर केलेलेे आहे. जिल्हाधिकार्‍यांनी नगराध्यक्षपद रिक्त करताना महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायत अधिनियम 1965 चे कलम 56 (3) अन्वये प्रात्त अधिकाराचा वापर केला आहे.

काय म्हटले आहे आदेशात?
जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की अर्जदार यांचा 27 मे 2020 रेाजीचा अर्ज तत्वतः मंजूर करण्यात येत आहे.
सहालबीन चाऊस हे माजलगाव नगर परिषदेचे नगराध्यक्ष असण्याचे थांबविण्यात येत आहे. असे घोषित करण्यात येत आहे.
मुख्याधिकारी नगर परिषद माजलगाव यांनी नगराध्यक्ष नगर परिषद ही जागा रिक्त झाल्याबाबत निवडणूक आयोगाला कळवावे.
हे आदेश सर्व विभागाला कळविण्यात येऊन संचिका अभिलेख कक्षात वर्ग करावी.

Tagged