suicide

झाडांची पानं टपाटपा गळावीत तशी माणसं आत्महत्येनं मरुन पडत आहेत

केज क्राईम न्यूज ऑफ द डे बीड मराठवाडा शेती

 बीड जिल्ह्यात सोमवारी तीन आत्महत्या

बीड/नांदूरघाट  दि.29 : झाडांची पानं टपाटपा गळून पडावीत तशी बीड जिल्हा आणि खासकरून नांदूरघाट परिसरातील माणसं आत्महत्या करून मरुन पडत आहेत. एक दिवसाआड झाडांना लटकणारी माणसं बघून बाया-बापड्यांचा जीव घाबराघुबरा झाला आहे. मागे राहीलेल्या चिल्ल्यापिल्ल्यांचा कसलाही विचार न करता माणसं मरणाला कवटाळू लागल्याने नांदूरघाट परिसराला कुणाचा शाप लागला की काय? असा दुर्दैवी सवाल वारंवार होणार्‍या आत्महत्येमुळे उपस्थित होत आहे. आज बीड जिल्ह्यात नांदूरघाट परिसरात एक, रामनगर मध्ये एक आणि चाकरवाडीत एक अशा तीन आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत.

नांदूरघाट परिसरात सलग तिसर्‍या दिवशी आत्महत्या
नांदूरघाट : केज तालुक्यातील नांदूरघाट परिसरात दररोज कुठे न कुठे आत्महत्या होत आहे. शनिवारी हंगेवाडी येथील विक्रम त्रिंबक हंगे या 27 वर्षीय अविवाहित युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तर रविवारी मुंडेवाडी येथील सिध्देश्वर वैजेनाथ खंदारे या 30 वर्षीय युवकाने सासरवाडीत येऊन आत्महत्या केली. या घटनेचे पंचनामे सुरु असतानाच नांदूरघाटपासून तीन किलोमीटर अंतरावर असणार्‍या खोमणवाडी येथील व नांदूरघाट ग्रामपंचायतमधील कर्मचारी संभाजी कल्याण खोमणे या 25 वर्षीय युवकाने शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन सोमवारी आत्महत्या केली. तर यापुर्वीच नांदूरघाटमधील 29 वर्षीय कापड व्यापारी संतोष क्षीरसागर यांनी 9 जून रोजी चौसाळा येथे जाऊन एका शेतात आत्महत्या केली होती. हा कापड व्यापारी लॉकडाऊन असल्याने दुकान उघडू शकत नव्हता. त्यामुळे त्याने दुकानासमोरच भाजी-पाला व्रिकीचं दुकान टाकलं होतं. पण नैराश्यातून त्यानंही आत्महत्या केली. या चारही आत्महत्या 25 ते 30 वर्षीय युवकांनी केलेल्या आहेत.

चाकरवाडीत तरुणाची
गळफास घेवून आत्महत्या
नेकनूर : बीड तालुक्यातील चाकरवाडी येथील एका 25 वर्षीय तरुणाने घरासमोर असलेल्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
नेकनूर हद्दीत असलेल्या चाकरवाडी येथील महादेव चंद्रसेन माने (वय-25) या तरुणाने घराच्या समोर असलेल्या चिंचाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार समोर आल्यानंर घटनेची माहिती नेकनूर पोलिसांना कळविण्यात आली. त्यानुसार पोलिस कर्मचारी कैलास बामदाळे, खांडेकर यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. तरुणाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

गळफास घेवून तरुणाची आत्महत्या
बीड : शेतामध्ये चिंचाच्या झाडाला ठिबकच्या पाईपने गळफास घेवून तरुणाने आत्महत्या केली. ही घटना तालुक्यातील रामनगर येथे सोमवारी (दि.29) दुपारी उघडकीस आली.
अजय बंडू बरडे (वय 26 रा.रामनगर) असे मयताचे नाव आहे. तो रविवारी रात्री घरातून बाहेर गेला होता. त्यानंतर रात्री घरी न परतल्याने त्याला नातेवाईकांनी संपर्क केला पण संपर्क झाला नाही. सोमवारी दुपारच्या सुमारास शेतात चिंचाच्या झाडाला ठिबकच्या पाईपने गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोह.सातपुते, पोना.बाळकृष्ण म्हेत्रे यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहे. अजय बरडे यांच्या पाश्चात आई, पत्नी, भाऊ, मुले असा परिवार आहे.

बोगस बियाणे अन् आत्महत्येचा काही संबंध?
नांदूरघाट परिसरात यंदा पेरलेले 70 टक्के सोयाबीन उगवलेलेच नाही. सोयाबीन न उगवल्यामुळे रविवारी सकाळीच एका शेतकर्‍याने कृषी दुकानासमोर रॉकेल अंगावर ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. अपुरा पाऊस, बोगस बियाणे आणि नापिकी यामुळे शेतकरी नैराश्येत जाऊन टोकाची पावलं उचलत होते. आता तरुणही त्याच मार्गाने जात असल्याने परिसर भयभीत झालेला आहे.

बापा पाठोपाठ लेकाचीही आत्महत्या
खोमणेवाडीत संभाजी खोमणे यांच्या कुटुंबियांचं दुर्दैव असे की 2015 मध्ये संभाजीच्या वडीलांनी देखील सततच्या नापिकीला कंटाळून आत्महत्या केली होती.

प्रशासनानं नैराश्य दूर करावं
प्रशासनाने आपल्या प्रशासकीय दफ्तरातील नोंदी तपासून मागील वीस वर्षात नांदूरघाट व नांदूरघाट परिसरात नेमकी किती जणांनी आत्महत्या केल्या याची आकडेवारी काढावी. ही आकडेवारी निश्चित चिंताजनक असणार आहे. एकट्या नांदूरघाटमध्ये गळफास आणि विषारी द्रव प्राशन करून 22 ते 23 आत्महत्या झालेल्या आहेत. खरीप हंगामातील आत्महत्येची सुरुवातच नांदूरघाट परिसरातून होत असल्याचं दुर्दैवी चित्र आहे. प्रशासनाने दोन-चार पैसे खर्च करून या भागातील युवक आणि शेतकर्‍यांमध्ये आलेलं नैराश्य दूर करावं. नितीन बानगुडे, गणेश शिंदे, अमोल मिटकरी, इंद्रजीत देशमुख या सारख्या वक्त्यांना विनंती करून नांदूरघाट परिसरात त्यांचे छोटेखानी कार्यक्रम घ्यावेत. जेणेकरून नांदूरघाट वरील सुतक फिटेल.

Tagged