kirana dukan

लॉकडाऊन किराणा व्यापार्‍यांच्या आवडीचा

बीड माजलगाव

माजलगाव । महेश होके

ग्राहकांची अव्वाच्या सव्वा दराने लूट
कुठं फेडणार हे पाप?

दि.11 : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी आज रात्री 12 पासून दहा दिवस लॉकडाउनचे आदेश दिले आहेत. यामुळे सणा-सुदीच्या दिवसांचा विचार करून नागरिकांनी किराणा साहित्यांची खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केली. परंतू या गर्दीचा फायदा उचलत व्यापार्‍यांनी ग्राहकाना सर्रास अव्वाच्या सव्वा दर लावून लूट केली. यामुळे ग्राहक संतप्त झाले असून व्यापार्‍यांनो कुठे फेडालं हे पाप? अशा सवाल करीत आहेत.
बीड जिल्ह्यात कोरोनाच्या अनुषंगाने यापूर्वीच दोन-अडीच महिनेे कडक लॉकडाउन पाळण्यात आला होता. यावेळी समाजातील प्रत्येकांनी गरजवंताना मदतीचा हात देवून सामाजिक बांधीलकी जपली होती. यात माजलगाव शहरातील नागरिकांचा उत्स्फुर्त सहभाग होता. ऐवढेच नव्हे तर जिल्ह्यात सर्वाधिक व्यापार्यांना जागा मालकांनी कुणी एक, कुणी दोन महिन्याचा किराया माफ केला. याबाबतीत माजलगावकरांनी पहिल्या लॉकडाऊनवेळी सामाजिक बांधीलकीत अग्रेसर राहिले. मात्र आत्ता जिल्ह्यासह माजलगाव शहरात कोरोनाचे रूग्ण दिवसें-दिवस वाढत आहेत. यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी 12 ऑगस्टपासून 21 ऑगस्टपर्यंत लॉकडाउन घोषीत केला आहे. या दरम्यान पौळा, गणेश उत्सव, लक्ष्मी आगमन ही महत्वाचे सण येत आहेत. यामुळे नागरिकांनी सणा-सुदीसाठी लॉकडाउन दहा दिवस असल्याने किराणा सामानांच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केली होती. परंतू माजलगावातील व्यापार्‍यांनी मंगळवारी ग्राहकांच्या गर्दीचा फायदा उचलत अडवणूक करत अव्वाच्या सव्वा दराने ग्राहकांची लूट केली. सणा-सुदीच्या दिवस असल्याने ग्राहकांनीही गपगुमान खरेदी केली. परंतु किराणा दुकानदारांकडे बघण्याचा ग्राहकांचा दृष्टीकोन यामुळे बदलून गेला आहे.

दाळ, तेल, नारळांच्या भावात प्रचंड वाढ
दहा दिवस लॉकडाउन असल्याने अन् त्यात सणा-सुदीचे दिवस आले. यामुळे नागरिकांनी पोळ्यासाठी किराणा साहित्य खरेदीची झुंबड उडाली. याचा गैरफायदा घेत व्यापार्‍यांनी तेल, दाळ, गूळ यांचे प्रचंड दर लावून लूट केली. त्यात कहर म्हणजे 15 रूपयांना मिळणारा एक नारळ, हा चक्क 25 रूपयांच्या दराने ग्राहकांच्या माथी व्यापार्‍यांनी मारले.

जिल्हाभरात हीच परिस्थिती
एकट्या माजलगावातच हे चित्र होते असे नाही तर अख्खा जिल्हाभर हेच चित्र पहायला मिळाले. यात दोष किराणा दुकानदारांचा नसून मोठ्या डिलरचा आहे. त्यांनी छोट्या दुकानदारांना अव्वाच्या सव्वा दराने माल विकला तोच कित्ता पुढे छोट्या दुकानदारांनी गिरवला. अख्ख्या लॉकडाऊनमध्ये किराणातील मोठ्या डिलर लोकांनी पुढील 5 वर्षाचा धंदा या चार महिन्यात केला आहे.

टिप- बातमीत वापरलेला फोटो प्रतिकात्मक आहे.

Tagged