aranwadi sathwan talav

अरणवाडीतील साठवण तलावाचे काम बोगस

धारूर

भविष्यात मोठ्या धोक्याची शक्यता

जुन्याच भिंतीला नव्याने डागडुजी करण्याचा प्रकार

भिंतीच्या भरावासाठी दगडगोटे

साठवण तलावाचा होऊ शकतो पाझर तलाव

किल्ले धारूर । सचिन थोरात
दि.11 : मागील पंधरा वर्षापासून तालुक्यातील महत्त्वाचा असणारा आरणवाडी साठवण तलाव या न त्या कारणामुळे काम सुरू झाल्यापासूनच चर्चेत राहिला आहे. पंधरा वर्षांपूर्वी झालेले काम नंतर बंद राहिले. यानंतर मागील सात-आठ वर्षे स्थानिकांनी हा साठवण तलाव पूर्ण करण्यासाठी वेळोवेळी आंदोलने केली. त्यामुळे या साठवण तलावाचे काम मागील तीन महिन्यापासून प्रत्यक्षात सुरू करण्यात आले आहे. परंतु सुरू करण्यात आलेले काम अत्यंत बोगस करण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात या साठवण तलावाच्या खालील बाजूस असणार्‍या आरणवाडी, चोरांबा, थेटे गव्हाण, पहाडी पारगाव या गावांना धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या कामाच्या गुणवत्तेकडे लक्ष देत काम गुणवत्तापूर्ण करून घेणे गरजेचे आहे.
धारुर तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचा असणारा शहरापासून चार किमी अंतरावरील आरणवाडी साठवण तलाव हा मागील पंधरा ते सोळा वर्षांपूर्वी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यानंतर निधी कमतरतेमुळे हे काम पूर्ण होऊ शकले नव्हते. या साठवण तलावाचे काम पूर्ण करण्यासाठी त्या परिसरातील आरणवाडी, चोरांबा, थेटे गव्हाण, पहाडी पारगाव तसेच परिसरातील गावांनी वेळोवेळी आंदोलने केली आहेत. वेगवेगळ्या सामाजिक संघटना राजकीय पक्षांनीही या आंदोलनास पाठिंबा देऊन काही वेळा तर धारूर माजलगाव हा राज्य महामार्ग बंद ठेवत आगळेवेगळे आंदोलने केली होती. सर्व परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाने मागील तीन महिन्यापूर्वी या आरणवाडी साठवण तलावाचे काम पुन्हा सुरू केले आहे. या साठवण तलावाचे होत असलेले काम सद्यस्थितीत बोगस सुरू आहे. साठवण तलावाचा भराव भरत असताना बाजूलाच महामार्गाच्या रस्त्याचे खोदून टाकलेले दगडगोटे वापरण्यात येत आहेत. तसेच या ठिकाणी भरावासाठी वापरण्यात येणारी माती ही भरवासाठी उपयुक्त होईल अशी न वापरता परिसरातीलच डोंगरांचा माती वजा मुरूम काढत भराव भरण्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी पंधरा वर्षांपूर्वी तयार केलेला सांडवा दगडी बांधकामातील सांडवा आज जीर्ण झालेला आहे. त्या सांडव्याच्या भिंतीस मोठमोठाल्या भेगा पडलेल्या आहेत. परंतु त्याच भिंतीस थातूर मातूर काँक्रिटीकरण करत हा सांडवा नव्याने केल्याचं भासवलं जात आहे. त्यामुळे भविष्यात या साठवण तलावात पाणी साचून राहिल्यानंतर सांडव्याची भिंत फूटू शकते. तलावाच्या खालील बाजूस असणार्‍या आरणवाडी, चोरांबा, थेटे गव्हाण, पहाडी पारगाव या परिसरातील गावांना मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने या अतिमहत्त्वाच्या साठवण तलावाकडे पारदर्शकपणे लक्ष देत हा साठवण तलाव पूर्ण करावा अन्यथा साठवण तलावाचा पाणी साठवण्यासाठी उपयोग न होता तलाव पाझरतलाव म्हणून समोर येऊ शकतो. हा भविष्यातील धोका ओळखून प्रशासनाने या कामाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

हा साठवण तलाव भविष्यात या परिसरातील शेतकर्‍यांसाठी हरितक्रांती साठी वरदान ठरणार आहे.या साठवण तलावासाठी मागील दहा वर्षात भाजप,राष्ट्रवादी ने विरोधी पक्षात असताना आंदोलने केली आहेत.तर शेतकरी कामगार पक्ष, संभाजी ब्रिगेड यांनी या साठवण तलावासाठी वेळोवेळी शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी वेगवेगळे आंदोलन करत या साठवण तलावाचे महत्त्व अधोरेखित केलेले आहे. त्यामुळे आज हे काम सुरू झाले असले तरी बोगस कामामुळे भविष्यात या साठवण तलावाचा परिसरातील शेतकर्‍यांना फायदा होणार नाही.

लोकप्रतिनिधी झोपले का?
आरणवाडी साठवण तलावाचे काम उघडपणे बोगस करण्यात येत आहे. याची कल्पना स्थानिकच्या लोकप्रतिनिधींना नसावी याचे आश्चर्य वाटते. लोकप्रतिनिधींना खरेच हे काम बोगस होत आहे हे माहिती नाही की त्यांचाच बोगस कामाला पाठींबा आहे असा सवाल स्थानिकचे नागरिक उपस्थित करीत आहेत.

Tagged