crime

एक कोटी रुपयांची कॅपीटेशन फिस उकळली

क्राईम न्यूज ऑफ द डे परळी बीड

परळी दि. 19 : परळीच्या वैद्यनाथ कॉलेमध्ये एक कॅपिटेशन फिसच्या नावाखाली प्रत्येक विद्यार्थ्यांकडून 50 हजार रुपयांची फिस उकळल्याप्रकरणी संस्थेचे संचालकांवर महाराष्ट्र शैक्षणिक संस्था अधिनियम 1987 आणि कलम 3 आणि 7 चे उल्लंघन केल्याप्रकरणी परळी शहर ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
जवाहर एज्युकेशन सोसायटी परळीचे संचालक भास्कर पाटलोबा चाटे यांनी शहर ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सन 2018 पासून जवाहर एज्युकेशन सोसायटी संचलित वैद्यनाथ कनिष्ट महाविद्यालय परळी येथे इयत्ता 11 वी आणि 12 विज्ञान विषयाच्या वर्गासाठी विद्यार्थी आणि पालकांकडून प्रतिवर्षी 50 हजार रुपये कॅपिटेशन फिस घेण्यात आली. वैद्यनाथ महाविद्यालय परिसरातील मुलींच्या वस्तीगृहांच्या इमारतीत शिकवणी वर्ग विद्यमान संस्थाचालक तथा अध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, सचिव दत्तात्रय गणपतअप्पा इटके, कोषाध्यक्ष सुरेश बाबुलाल अग्रवाल व प्राचार्य रामचंद्र किशनराव इप्पर यांच्यातर्फे चालवले जात आहेत. सदरील शिकवणी वर्ग हे ऑगस्ट 2018 साली सुरू केले असून तत्पुर्वी 23 फेब्रुवारी 2018 रोजी लोकनेते गोपीनाथराव मुंडे अकॅडमीला संस्थेच्या खात्यातून 8 लाख रुपये व 17 एप्रिल 2018 रोजी 2 लाख रुपये असे एकूण 10 लाख रुपये देण्यात आले आहेत.
वैद्यनाथ कनिष्ट महाविद्यालयाच्या 11 वी व 12 वी विज्ञान शाखेच्या 300 विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालय परिसरातील बांधलेल्या मुलींच्या वसतीगृह इमारतीत शिकवणी वर्ग घेतले जात आहेत. वसतीगृह इमारतीतील रुममध्ये पाडापाडी करून शिकवणी वर्गासाठी हॉल तयार केले आहेत. यावर 3 लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. वैद्यनाथ महाविद्यालयाच्या 11 वी व 12 वी च्या 300 विद्यार्थ्यांसह इतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाही प्रवेश दिला जात आहे. विद्यार्थ्यांकडून जमा करण्यात आलेली फिस सुरुवातीला संस्थेचे बँक खाते क्र.101221037607 मध्ये 22 लाख 35 हजार 841 रुपये जमा करण्यात आले. वैद्यनाथ बँकेतच लोकनेते गोपीनाथराव मुंडे अकॅडमी या नावाने उघडलेल्या खाते क्रं. 101231004488 या खात्यात 1 सप्टेंबर 2018 पासून विद्यार्थ्यांकडून वसूल केलेली फिस 83 लाख 61 हजार 344 रुपये (दोन्ही बँक खात्यात मिळून 18 ऑगस्ट 2018 पासून ते 14 जून 2019 पर्यंत 1 कोटी 6 लाख रुपये जमा करण्यात आले आहेत) दिनांक 1 सप्टेंबर 2018 पासून ते 2019 ते 2020 या शैक्षणिक वर्षापासून 5 वी ते 10 वीच्या वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी शिकवणी वर्ग अकॅडमीतर्फे वैद्यनाथ महाविद्यालयाच्या विद्यापीठ अनुदान मंडळाच्या अनुदानातून बांधलेल्या क्रिडा विभागाच्या इमारतीत सुरु केले आहेत.
जवाहर एज्यूकेशन सोसायटी संचलीत वैद्यनाथ महाविद्यालय परळी संचालक मंडळ संस्थाचालक तथा अध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, सचिव दत्तात्रय गणपतअप्पा इटके, कोषाध्यक्ष सुरेश बाबुलाल अग्रवाल व प्राचार्य रामचंद्र किशनराव इप्पर यांनी 2018 पासून इयत्ता 11 वी व 12 वी विज्ञान विषयाच्या वर्गासाठी विद्यार्थी व पालकाकडून प्रतिवर्षी 50 हजार रुपये कॅपिटेशन फिस घेऊन वैद्यनाथ महाविद्यालय परिसरातील मुलींच्या वसतीगृहाच्या इमारतीत शिकवणी वर्ग चालवून महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (कॅपिटेशन फिस घेण्यास प्रतिबंध) अधिनियम 1987 चे उल्लंघन केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tagged