मुगगावमधील त्या कावळ्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’ने

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड मराठवाडा महाराष्ट्र

 मुगगाव  दि.11 : पाटोदा तालुक्यातील मुगगाव येथे दोन दिवसापासून मोठ्या प्रमाणात कावळ्यांचा मृत्यू झाला होता. येथील कावळ्याचा मृत्यू ‘बर्ड फल्यू’ने झाला असल्याचा अहवाल प्राप्त झाल्याची माहिती जबाबदार अधिकार्‍यांनी कार्यारंभशी बोलताना नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे. त्यामुळे जिल्हाभरात खळबळ उडाली आहे. सध्याही मुगगाव परिसरातील पोल्ट्री फार्मवरील कोंबड्यांच्या रक्ताचे नमुने गोळा करण्याचे काम सुरु झाले आहे.
बर्ड फ्ल्यूचा धोका वाढल्याने जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिकांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे. अनेकांनी बँकांचे कर्ज घेऊन या व्यवसायत उडी घेतली होती. मागील वर्षी कोरोनाने त्यांचे मोठं नुकसान केलं आहे. यावर्षी बर्ड फ्ल्यू आल्याने पोल्ट्री चालक धास्तावले आहेत. मुगगाव येथे कावळ्याच्या मृत्यूने खळबळ उडाली होती. पशुवैद्यकीय अधिकारी त्यांच्या टीमसह मुगगाव येथे दाखल होत परिसराची पाहणी करून कावळ्यांचे मृत्यू कशामुळे होत आहेत याची चौकशी केली होती. तीन कावळ्यांचे शव भोपाळला परीक्षणासाठी पाठवले होते. सोमवारी (दि.11) भोपाळ येथील अहवाल प्राप्त झाला असून कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यू ने झाला असल्याची स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्हाभरात खळबळ पसरली आहे. दरम्यान जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याशी कार्यारंभने संपर्क साधला असता त्यांनी नेहमीप्रमाणे रिस्पॉन्स दिलेला नाही. त्यामुळे अधिकृत माहिती पुढे आलेली नाही.