sunil kendrekar

नियम न पाळल्यास दोन महिन्यात बीड जिल्ह्याची परिस्थिती हाताबाहेर जाईल

बीड

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी व्यक्त केली भिती

औरंगाबादचे दवाखाने फुल्लं झाले त्यामुळे विसंबून राहू नका

बीड : बीड जिल्हावासियांनी मास्क नीट वापरले नाहीत, तर पुढील दोन महिन्यातच बीड जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती हाताबाहेर जाईल. त्यानंतर याठिकाणी कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठीची यंत्रणा अपुरी पडेल, अशी भीती विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, शेजारच्या औरंगाबादेतही दवाखाने फुल्ल झाले आहेत. त्यामुळे त्यावर विसंबून राहू नका. कोरोना नियंत्रणासाठी मास्क हाच उपाय आहे. विशेष म्हणजे औरंगाबादपेक्षा बीड जिल्ह्यात मास्क वापरणार्‍यांचे प्रमाण अधिक असल्याचे निरीक्षण नोंदवत नागरिकांचे कौतुकही केले.

कोरोना परिस्थितीबाबत आढावा बैठक पार पडल्यानंतर जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांच्या कक्षात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी जगताप यांच्यासह आस्थापनेचे विभागीय उपायुक्त विकास बेदमुथा, पोलीस अधीक्षक आर.राजा, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गीते हे उपस्थित होते.
पुढे बोलताना सुनील केंद्रेकर म्हणाले, कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी या तिघांनाही आपण फिल्डवर उतरून कामे करण्याचे निर्देश दिले आहेत. अधिकार्‍यांनी आपल्या गाडीत मास्क ठेवावेत. मास्क नसणार्‍या विरोधात कारवाई करून त्यांना मास्क देत बजावले पाहिजे. तसेच, लग्नात केवळ 50 लोक येतील याची दक्षता घ्यावी. गर्दी करून लग्न करणार्‍यांविरोधात कारवाई केली जाईल. हॉटेलबाबतचे निर्बंध कठोर करण्याचे निर्देश जिल्हाधिकार्‍यांना दिले. नागरिकांनी शासन, प्रशासनाकडून घालून दिलेेले निर्बंध पाळावेत. खेड्यात अंमलबजावणी होत नाही. अजुनही पारावर लोकं बसलेले असतात. त्याठिकाणी कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच, कोरोना रूग्ण बाहेर फिरताना आढळून आल्यास थेट फौजदारी कारवाई केली जाईल असा इशारा सुनील केंद्रेकर यांनी दिला आहे.


मला साथ दिली, त्याचप्रमाणे
प्रशासनाच्या पाठिशी उभे रहा

बीडचा मीडिया हा सामाजिक बांधिलकी जोपासणारा आहे असं सांगत आपण मला साथ दिलीत, त्याप्रमाणे कोरोना काळात जिल्हा प्रशासनाच्या तिन्ही प्रमुख अधिकार्‍यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे रहा. तुमच्या सूचना त्यांना कळवत चला, ताणतणावात काम राहून गेलेच, तर राग-राग करू नका, असे आवाहन माध्यमांच्या प्रतिनिधींना केले. तत्पूर्वीच, आढावा बैठकीत त्यांनी माध्यमांशी समन्वय ठेवण्यासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकार्‍यावर जबाबदारी निश्चित करून द्यायला हवी अशी अपेक्षा व्यक्त केली होती.

कोरोनाबाधितांवर उपचारासाठी 24
तासात खाजगी रूग्णालयांना परवानगी

खाजगी रूग्णालये कोविडचे उपचार देण्यास तयार असताना त्यांना परवानगी नाकारणे अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनात उलटी गंगा वाहू लागली असल्याचे दिसून येते. ज्यांचे प्रस्ताव येतील, त्यांना 24 तासात परवानगी द्यावी, असे निर्देश केंद्रेकरांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

हलक्यात घेऊ नका अन्यथा जड जाईल!
केंद्रेकरांनी कोरोना स्थितीचा दोन तास आढावा घेतला. यावेळी त्यांनी बेजबाबदार अधिकार्‍यांवर चांगलेच धारेवर धरले होते. मुंबईवरून फोन येतात. त्यांना मला उत्तरे द्यावी लागतात, त्यामुळे आता हलक्यात घेऊ नका, तुम्हाला जड जाईल, असा रोखठोक इशाराच त्यांनी दिला आहे. या बैठकीत कामचुकारपणा करणार्‍या अधिकार्‍यांचे धाबे दणाणले होते.

मास्क न वापरणार्‍यांना झोडून काढा
कोरोना नियंत्रणासाठी मास्क हाच उपाय आहे. त्यामुळे मास्क न वापरणार्‍या व मास्क घालुनही नाकाखाली असलेल्या लोकांना थेट झोडून काढा अशा सूचना पोलीस अधीक्षक आर. राजा यांना दिल्या आहेत. याशिवाय, दंडात्मक कारवाई करावी असेही ते म्हणाले.

काम करायचे नसेल तर राजीनामे द्या
कोरोना परिस्थितीचे अधिकार्‍यांनाच गांभीर्य नसल्याचे आढावा बैठकीदरम्यान दिसून आले. अशा स्थितीतही केवळ कारकूनी कामे करण्याचा मानस असेल, आणि कामे करायची नसतील तर थेट राजीनामे देऊन घरी बसा अशा शब्दात केंद्रेकरांनी सुनावले.