दिलासादायक : श्वसनाचाही होता त्रास
सय्यद दाऊद
आडस : कोरोनाने सध्या सर्वत्र हाहाकार माजविला असून दररोज हजारो बाधित व मृत्यू येत असलेल्या आकडेवारी मुळे लोकांमध्ये भीती पसरली आहे. मात्र आडस (ता.केज) येथे दिलासादायक बातमी असून येथील 90 वर्षाच्या एका वृद्धाने कोरोनावर दोन वेळा मात केली. त्यामुळे कोरोना हा 100 टक्के बरा होणारा आजार असल्याने घाबरण्यासारखं काही नाही असं त्यांनी सांगितले आहे.
पांडुरंग आत्माराम आगलावे (वय 90) असे कोरोनावर मात करणार्या वृद्धाचे नाव आहे. कोरोनाच्या दुसर्या लाटेने बीड जिल्ह्यात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. दररोज हजारच्या पुढे कोरोनाबाधितांचा आकडा पाहून काळजाचा ठोका वाढत आहे. तर मृत्यू व त्यांच्या अग्नी दिलेले फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे पाहून माणसांच्या मनांचा थरकाप उडाला असून कोरोना म्हणजे मृत्यू असाच समज झाला आहे. यामुळे आज प्रत्येक जण कोरोनाच्या दहशतीने घाबरून गेलेले दिसत आहे. मात्र याकाळात सर्वांना कोरोना विरोधात लढण्यासाठी बळ देणारी व मनातील कोरोनाची भीती घालविणारी घटना आडसमधून समोर आला. येथील पांडुरंग आगलावे यांना सहा महिन्यात दोन वेळा कोरोनाने आपल्या जाळ्यात ओढले. त्यांना 13 नोव्हेंबर 2020 रोजी दिवाळीच्या पहिल्या दिवशी पहिल्यांदा कोरोना केला. त्यानंतर केज येथील कोविड सेंटरमध्ये उपचार घेऊन 10 व्या दिवशी ते ठणठणीत होऊन घरी परतले. यानंतर 30 मार्च 2021 रोजी कोरोना प्रतिबंधित लस घेतली. पुढे त्यांना सर्दी, खोकला असल्याने कोरोना चाचणी केली असता 3 एप्रिल रोजी कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले. ही सहा महिन्यातील दुसरी वेळ होती. मात्र, यावेळी कोरोनाने त्यांच्यावर पकड मजबूत केली. यावेळी त्यांचा एच.आर.सी.टी. स्कोर 18/25 होता. त्यामुळे श्वास ही घेता येत नव्हता तर घरातील व्यक्ती तर हे सर्व पाहून घाबरले होते. मात्र पांडुरंग आगलावे यांच्या शरिरातील बळ संपलं तरी मन घट्ट असल्याने असा डाव टाकला की, कोरोनाला चीतपट करून लोळविले. 14 व्या दिवशी म्हणजे 17 एप्रिल रोजी ते ठणठणीत होऊन घरी परतले. दोन वेळा कोरोनाला चीतपट करणारे पांडुरंग आगलावे यांचा तरुणांनी आदर्श घेण्याची गरज आहे. कोरोनाला न घाबरता सामोरे जावे. याही पेक्षा कोरोना होऊ नये म्हणून मास्क, सुरक्षित अंतर, सतत हात धुणे यांसह शासन, प्रशासन करत असलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन ही त्यांनी केले.