rajendra hoke patil

आरक्षणासाठी मराठा समाजाने एकजूट दाखवून मोर्चात सहभागी व्हावे

बीड माजलगाव

मराठा क्रांती मोर्चा माजलगावचे समन्वयक राजेंद्र होके पाटील यांचे प्रतिपाद

माजलगाव- मागील अनेक वर्षापासून शांततेच्या मार्गाने मराठा समाज आरक्षण मागत आहे. आरक्षणासाठी अनेकांनी बलीदान दिले आहे. तेव्हा आरक्षण मिळाले, परंतु सर्वोच्च न्यायालयाने हे आरक्षण रद्द केले. यामुळे तमाम मराठा बांधवांचा भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे आता ही आरपारची लढाई आहे. पुन्हा एकदा आरक्षण मिळवण्यासाठी पहिल्यापासुनची तयारी सुरु झाली आहे. त्यामुळे समाजाने एकजूटपणे आपली ताकद दाखवण्याची गरज आहे. मोर्चा कोण काढतोय यापेक्षा तो मोर्चा कशासाठी काढला जातोय हे महत्वाचे आहे. त्यामुळे 5 जून रोजी बीडमध्ये आ.विनायक मेटे यांच्या उपस्थितीत निघणार्‍या मराठा क्रांती संघर्ष मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हा, असे अवाहन मराठा क्रांती मोर्चाचे माजलगाव समन्वयक राजेंद्र होके पाटील यांनी फेसबुक लाईव्हवरुन केले आहे.

पुढे बोलताना मराठा नेते राजेंद्र होके पाटील म्हणाले की, आजही 90 टक्के मराठा गरीब आहे. नापीकी व कर्जबाजीपणाला कंटाळून सर्वात जास्त आत्महत्या मराठा बांधवांनी केलेला आहे. फक्त 10 टक्के मराठ्यांकडे संस्था, उद्योगपती, जमीनजुमला व आमदार, खासदार, मंत्री आहेत. यांच्यामुळे 90 टक्के मराठा बांधवांवर अन्याय केला जात आहे. 90 टक्के शेतात काम करणार्‍या, मजुरी करणार्‍या मराठा बांधवांचा विचार सर्वोच्च न्यायालयाने केलेला नाही. ही बाब न्यायालयासमोर मांडणे गरजेचे आहे. आरक्षण नसल्यामुळे आज पिढीच्या पिढी बरबाद होत आहेत. कुठल्याही पक्षाचे आम्हाला घेणेदेणे नाही. जो पक्ष, संघटना मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करेल त्याचा आम्ही जाहीर सत्कार करु. मग तो एमआयएम पक्ष असला तरी हरकत नाही. आम्हाला फक्त आणि फक्त आरक्षण हवे आहे. मराठा आरक्षणावर बोलण्यासाठी एकही मराठा आमदार पुढे येत नाही. फक्त आ.विनायक मेटे यांनी आरक्षणासाठी नेहमीप्रमाणे आजही पुढाकार घेतलेला आहे. त्यामुळे 5 जून रोजी निघणार्‍या बीड येथील मराठा आरक्षण संघर्ष मोर्चास पाठींबा आहे. समाज सुधारायचा असेल तर कुठेतरी एकजुट दाखवण्याची गरज आहे. आणि ती वेळ आली आहे. त्यामुळे बीड येथून निघणार्‍या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होऊन समाजाची ताकद दाखवून द्यावी. असे अवाहनही मराठा नेते राजेंद्र होके पाटील यांनी फेसबुक लाईव्हवरुन बोलताना केले आहे.

सायकल, रिक्षा किंवा बैलगाडीने या
मराठा समाजाला आरक्षण हवं असेल तर ताकद दाखवल्याशिवाय मिळणार नाही. त्यामुळे 5 जून रोजी निघणार्‍या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा. सायकल, रिक्षा, बैलगाडी जे मिळेल त्याने या आणि मोर्चात सहभागी व्हा, असे अवाहन राजेंद्र होके पाटील यांनी केले आहे.

Tagged