शेतात बेकायदेशीररित्या बायोडिझेलची विक्री!

अंबाजोगाई क्राईम न्यूज ऑफ द डे बीड


वाहनांसह सव्वा दहा लाखांचा मुद्देमाल जप्त, डीवायएसपी सुनिल जायभाये यांची कारवाई
अंबाजोगाई
दि.24 ः तालुक्यातील कातकरवाडी शिवारातून बेकायदेशीर बायोडिझेल, टेम्पोसह टँकर असा एकूण 10 लाख 39 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून एक जण फरार झाला. त्यांच्यावर बर्दापूर पोलिसात पेट्रोलियम कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई उपअधीक्षक सुनिल जायभाय यांनी केली. नुकतीच सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी बायोडिझेलसह कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त केला होता.
बबन बाजगीरे (रा. अहमदपूर लातूर), रामकिसन मुंडे (रा. दगडवाडी, ता. अहमदपूर) आणि माधव बालाजी जायभाये (रा.कातकरवाडी, ता. अंबाजोगाई) अशी आरोपींची नावे आहेत. फुलचंद कातकडे याच्या कातकरवाडी येथील शेतात विनापरवाना बेकायदेशीररीत्या विक्री करण्याच्या उद्देशाने डिझेल सदृश इंधनाचा साठा केला असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक सुनील जायभाय यांच्या पथकातील पोलीस हवालदार सतीश कांगणे यांना प्राप्त झाली. त्यानंतर उपअधीक्षक जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली तत्काळ बर्दापूर पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरिक्षक अशोक खरात, पोलीस कर्मचारी सतीश कांगणे, आतकरे, सपकाळ यांनी खबर मिळालेल्या ठिकाणी छापा मारून एक टेम्पो (एमएच 26 एडी 7480) व त्यामध्ये 700 लिटर इंधन, टँकर (एमएच 24 जे 5999) ज्यामध्ये 3 हजार 100 लिटर इंधन असा एकूण 10 लाख 39 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी सतिश कांगणे यांच्या फिर्यादीवरुन बर्दापूर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला.

Tagged