एसटी कर्मचार्‍यांना पगारवाढ

न्यूज ऑफ द डे महाराष्ट्र

मंत्री अनिल परब यांची घोषणा

मुंबई : राज्यभरात सुरु असलेल्या एसटी कर्मचार्‍यांच्या संपाबाबत तोडगा काढण्यासाठी राज्य शासनाने पाऊल उचलले असून, मंत्री अनिल परब यांनी ऐतिहासिक पगारवाढीची घोषणा बुधवारी केली आहे. त्यांच्यासह शिष्टमंडळाची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यावेळी ते बोलत होते.

अनिल परब म्हणाले की, एसटी कर्मचार्‍यांचा संप सुरु होता. त्यातील प्रमुख मागणी विलिनीकरणाची होती. यावर सरकारची भूमिका स्पष्ट होती. हा विषय उच्च न्यायालयात गेला असून त्यावर त्रिसदस्यीय कमिटी बनवली. 12 आठवड्याच्या आत या कमिटीचा रिपोर्ट येईल. विलिनीकरणाबाबत कर्मचार्‍यांचे जे म्हणणं आहे ते कमिटीसमोर मांडावा असा कोर्टाचा आदेश आहे. त्यामुळे कामगारांची विलिनीकरणाची मागणी कोर्टात न्यायप्रविष्ट आहे. कमिटीचा जो काही निर्णय येईल तो मान्य करू अशी शासनाची भूमिका आहे. विलिनीकरणाबाबत न्यायप्रविष्ट बाब असल्याने तिढा निर्माण झाला. संपावर तोडगा काढण्यासाठी कर्मचार्‍यांचा पगारवाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे एसटी कर्मचार्‍यांच्या मूळ पगारात ही वाढ करण्यात येणार आहे. एसटीच्या इतिहासातील सर्वात मोठी पगारवाढ आहे असे ते म्हणाले. यापुढे प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेआधी एसटी कर्मचार्‍यांचा पगार होईल अशी हमी परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. तसेच, जे कामगार मुंबईत संपावर आहेत, त्यांना परवा कामावर येण्याची सूट असणार आहे. निलंबित कामगारांना पुन्हा सेवेत घेणार आहोत. आता एसटी कर्मचार्‍यांच्या पगारवाढीमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर 660 कोटींचा बोजा पडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कशी असेल पगारवाढ?
-नवीन कर्मचार्‍यांच्या मूळ वेतनात 5 हजारांची वाढ. इतर भत्त्यासह एकूण वेतनात 7200 रुपये वाढ
-10 वर्ष सेवा झालेल्या कर्मचार्‍यांच्या मूळ पगारात 4 हजारांची वाढ, इतर भत्त्यासह 5760 रुपये वाढ
-20 वर्ष सेवा झालेल्या कर्मचार्‍यांच्या मूळ पगारात 2500 वाढ, इतर भत्त्यासह 3600 रुपये वाढ
-30 वर्ष सेवा झालेल्या कर्मचार्‍यांच्या मूळ पगारात 2500 वाढ, इतर भत्त्यासह 3600 रुपये वाढ

Tagged