GEVARAI MEDICAL BLAST

धक्कादायक; गेवराईत मयत डॉक्टरवर गुन्हा दाखल

क्राईम गेवराई बीड महाराष्ट्र

मेडिकलमधील स्फोटामागे डॉक्टर असल्याचा पोलीसांचा तपास


गेवराई :
गेवराईत मेडिकलमध्ये झालेल्या स्फोट प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. मयत झालेल्या डाक्टरनेच हा स्फोट घडवून आणल्याचा जवाब जखमी कंम्पाऊंडरने दिल्याने पोलीसांनी मयत डॉक्टर सुधाकर भाऊसाहेब चोरमले (वय 35 रा. बाग पिंपळगाव ता.गेवराई ) व कम्पाऊंडर सुनील माळी यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रीया सुरु केली आहे, अशी माहिती गेवराईचे उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड यांनी ‘कार्यारंभ’शी बोलताना दिली. रात्री साडेदहापर्यंत गुन्हा नोंद झालेला नव्हता. पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार मयत डॉक्टरचा व मेडिकल चालकांचा देवाण-घेवाणीवरुन जुना वाद होता. त्या रागातून मयत डॉक्टरने कम्पाऊंडरला रात्री एकच्या सुमारास बोलावून घेतले. या मयत डॉक्टरने आधीच मेडिकलची एक बनावट चावी बनवून घेतली होती. त्या चावीने शटर उघडून डॉक्टर आत गेले. आणि काही वेळातच मेडिकलमध्ये मोठा स्फोट झाला. या स्फोटात डॉक्टर दुकानाच्या बाहेर 15 फुट लांब फेकले गेले. तर बाहेर उभा कंम्पाऊंडर जखमी झाला आहे. घटनेची माहिती रात्रीच अग्निशमन दलाला मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन आग विझवली. त्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी दाखल होत जागेचा पंचनामा केला असता त्यांना अनेक गोष्टी संशयास्पद आढळून आल्या.

कंम्पाऊंडरने दिली माहिती

मयत डॉक्टर मेडिकलमध्ये इतक्या रात्री कशाला गेला असा प्रश्न पोलीसांना पडला होता. तेव्हा त्यांनी जखमी कंम्पाऊंडरकडे चौकशी केली. त्यावेळी त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. पोलीसांना संशय आल्याने त्यांनी पोलीसी खाक्या दाखविण्याची धमकी देताच कंम्पाऊंडरने घडलेली हकीकत पोलीसांना सांगितली.

सॅनिटायझर, फ्रिजचा स्फोट?

मयत डॉक्टरने मेडिकलमध्ये प्रवेश केल्यानंतर मेडिकलला आग लावण्याचा प्रयत्न केला असावा. त्यावेळी मेडिकलमध्ये मोठ्या प्रमाणावर सॅनिटायझर होते. सॅनीटायझरने पेट घेतल्यानंतर फ्रिजमधील गॅसचा स्फोट झाला आणि डॉक्टर बाहेर येऊन पडले, असा प्राथमीक अंदाज पोलीसांनी लावला आहे. त्यानुसार गेवराई पोलीस ठाण्यात मयत डॉक्टरविरोधात फौजदार टाकसाळे यांच्या फिर्यादीवरून कलम 308, 436, 120 (ब), 34 भादंविनुसार गुन्हा नोंद करण्याची प्रक्रीया सुरु असल्याची माहिती डीवाएसपी स्वप्नील राठोड यांनी दिली.

Tagged