आ.सोळंके, शिक्षणाधिकारी, पोलीसांचे स्टिंग;1 लाख 76 हजाराची रोकड जप्त
माजलगाव दि.14 : शहरात विद्यार्थ्यांची अडवणूक करत फिसच्या नावाखाली लूट करत असल्याची ओरड सिद्धेश्वर विद्यालयात नेहमीच होते. मंगळवारी (दि.14) तीन कर्मचार्यांना विद्यार्थ्यांच्या पालकांकडून लूट करत असल्याचा प्रकार उघड झाला. येथील वैष्णवी मंगल कार्यालयात सुरू असलेल्या या कारस्थानावेळी स्वतः आमदार प्रकाश सोळंके यांनी शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी, पोलीसांसह जाग्यावर स्टिंग केले. यावेळी पालकांकडून फिसच्या नावाखाली घेतलेली 1 लाख 76 हजार रोकड जप्त केली. या घटनेने शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली आहे.
येथील शिक्षण संकुलात स्थानिक कार्यकारणीकडून नेहमीच प्रवेश फिसच्या नावाखाली पालकांची लूट करण्यात येत असल्याची ओरड होते. याबाबतीत अनेक सामाजिक कार्यकर्त्यांच्या वरिष्ठांकडे तक्रारी आहेत. मंगळवारी येथील संस्थेचे स्थानिक नियामक मंडळाचे सदस्य असणार्या जगदीश साखरे यांच्या वैष्णवी मंगल कार्यालयात पालकांना बोलावून इयत्ता पाचवीच्या सेमी इंग्लिशच्या प्रवेशासाठी प्रत्येक प्रवेशासाठी पालकाकडून पंधरा, वीस हजार रुपये फिस घेऊन प्रवेश देण्यात येत होता. या प्रकाराची तक्रार शिक्षणाधिकारी कुलकर्णी, आ.सोळंके यांना तक्रारकर्त्याकडून देण्यात आली. यावेळी आमदार आणि शिक्षणाधिकारी यांना पोलिसांना सोबत घेऊन वैष्णवी मंगल कार्यालय येथे धडक जाऊन स्टिंग ऑपरेशन केले.त्या वेळी या ठिकाणी पालकांकडून कर्मचार्यांना मार्फत रोख रक्कम घेण्याची प्रक्रिया सुरू होती. या ठिकाणी पोलिसांनी 1 लाख 76 हजार रुपये रोख रक्कम जप्त केली. दरम्यान या प्रकाराने संस्थेत गेल्या कित्येक वर्षापासून चाललेला अनागोंदी कारभार समोर आला आहे. यावेळी शिक्षक ढगे, आदमने यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर दोन शिक्षक फरार झाल्याची माहिती आहे. दरम्यान चारपर्यंत पालकांची जवाब नोंदविण्याचे काम सुरू होते. या जबाबावरून संबंधित दोन्ही शिक्षकांना माजलगाव शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. माजलगाव शिक्षणाधिकारी व बीड जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्या तक्रारीवरून माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर यांनी दिली.