समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; 25 जणाचा दुर्दैवी मृत्यू

न्यूज ऑफ द डे विदर्भ

बुलढाणा : समृध्दी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हलचा भीषण अपघात झाला. अपघातानंतर बसच्या डिझेल टाकीने पेट घेतला. या दुर्देवी घटनेत आतापर्यंत २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती आहे. बुलडाण्याजवळील सिंदखेडराजा परिसरात शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून बसवरील आग नियंत्रणात आणली. ट्रॅव्हल्स मधील होरपळून मृत्यू झालेल्या प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे.

अपघातग्रस्त ट्रॅव्हल बस नागपूर येथून पुण्याच्या दिशेने निघाली होती. या बसमधून ३३ प्रवाशी प्रवास करत होते. हा अपघात इतका भीषण होता, की २५ प्रवाशांचा अक्षरश: कोळसा झाला. मृतांमध्ये महिला पुरूष तसेच लहान मुलांचा समावेश आहे. पोलिसांकडून मृतांची ओळख पटवणे सुरू आहे.

दरम्यान, बस चालकासह बसमधील ८ प्रवाशी सुखरूप बचावले आहेत. हा अपघात नेमका कसा झाला याबाबत बसचालकाने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विदर्भ ट्रॅव्हल्सची खासगी बस ३० जून रोजी सायंकाळी ५ वाजता नागपूर वरून पुण्याच्या दिशेने जात होती.

1जुलैच्या रात्री दीड वाजेच्या सुमारास बस बुलढाणा येथील सिंदखेडराजा परिसरात आली. बसचा वेग जास्त असल्याने समोरील टायर फुटले. त्यामुळे बस थेट दुभाजकाला धडकली. क्षणार्धात बसने पेट घेतला. बस दरवाजाच्या दिशेने उलटल्याने बसमधून प्रवाशांना बाहेर पडता आले नाही.

काही प्रवाशांनी खिडकीच्या काचा फोडून बाहेर उड्या घेतल्या. मात्र, गाढ झोपेत असलेल्या प्रवाशांना बाहेर पडता आलं नाही. त्यामुळे २५ प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. या अपघातात चालकासह ८ जणांचे प्राण वाचले. या भयानक घटनेमुळे मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

या अपघातात जखमी झालेल्या लोकांची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघे काही वेळात बुळढण्याच्या दिशेने ते रवाना मुंबईहून होणार आहेत. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची शासकीय मदत शिंदे यांनी जाहीर केली आहे.

Tagged