अशोक शिंदे । नेकनूर
दि.19 प्रसिध्द कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर आपल्या वक्तव्यांनी अनेकदा चर्चेत असतात. त्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे त्यांच्यावर नागरिकांनी याआधी गुन्हे दाखल करण्याच्या मागण्या केलेल्या आहेत. मात्र, नेकनूर परिसरातील कळसंबर येथे इंदुरीकर महाराजांनी कीर्तनाची तारीख दिली होती. परंतू अचानक त्यांनी ती तारीख रद्द केली. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी थेट नेकनूर पोलीस ठाणे गाठत इंदुरीकर महाराजांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या मागणीने खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रसिद्ध प्रबोधनकार म्हणून इंदोरीकर महाराजांची राज्यभरात चर्चा आहे. तसेच त्यांची कीर्तने लोकप्रिय आहेत. त्यामुळे 19 ऑगस्ट रोजी इंदुरीकर महाराज यांची बीड तालुक्यातील कळसंबर येथे कीर्तनाची तारीख घेण्यात आली होती. परंतू इंदूरीकर महाराज यांनी हा किर्तनाचा कार्यक्रम अचानक रद्द करण्याचा आदेश दिला. यानंतर गावकर्यांमध्ये एकच संतापाची लाट उसळली आणि गावकर्यांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. इंदुरीकर कीर्तनासाठी येणार म्हणून एक ते दीड लाख रुपयांचा खर्च करण्यात आला होता. मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. परंतू अचानक कार्यक्रम रद्द केल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली असून इंदुरीकर महाराजांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नेकनूर ठाण्यात दाखल झालेल्या ग्रामस्थांनी केली आहे.
गावात संतापाची लाट
कीर्तनाचा कार्यक्रम रद्द झाल्यामुळे कळसंबर गावातील नागरिकांमध्ये संतापाची लाट पाहायला मिळाली. ग्रामस्थांनी सांगितले की, इंदूरीकर महाराज यांनी आजच्या कीर्तनासाठी आम्हाला शब्द दिला होता. त्यामुळे आजची तारीख निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर आम्ही गावकर्यांनी सुमारे एक ते दीड लाख रुपये खर्चून कीर्तनाची पूर्ण तयारी केली. मात्र, अचानक इंदुरीकर महाराज यांनी कीर्तन रद्द केल्याचा निरोप आम्हाला आला. हे योग्य नाही. आम्ही पैसे गोळा करून हा कार्यक्रम ठेवला होता. मात्र, आजच्याच दिवशी त्यांनी इतर ठिकाणी कीर्तन ठेवले तर आम्ही त्यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करणार आहोत असे एका संतप्त गावकर्याने सांगितले.
आजारी असाल तर दवाखान्यात नेतोत
इंदुरीकर महाराज यांनी येणार नसल्याची कल्पना दिल्यानंतर ग्रामस्थ म्हणाले काही आजार, काही त्रास असेल तर दवाखान्यात घेवून जातोत. परंतू दुसरीकडे जास्त पैसे मिळतील यासाठी आमचा शब्द मोडू नका. आमची फसवणूक करू नका. तुमच्या कीर्तनासाठी गावातील गोरगरीबांनी पै-पै गोळा केलेली आहे.