बीड दि.26 : टॅक्स पावती न देता 7/12 फेरफार नोंद करण्यासाठी तलाठ्याने दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडअंती सात हजार रुपये खाजगी इसमाच्या हस्ते स्वीकारताना दोघांनाही बीड एसीबीने सोमवारी (दि.26) अंबाजोगाई शहरात रंगेहाथ पकडले.
प्रफुल्ल सुहासराव आरबाड (वय 30 रा.प्रशांतनगर, अंबाजोगाई) असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे. तर नजीरखान उमरद राजखान पठाण (वय 43 रा.फ्लॉवर्स क्वार्टर अंबाजोगाई) असे खाजगी इसमाचे नाव आहे. तक्रारदाराने खरेदी केलेल्या प्लॉटची 7/12 फेरफार नोंद करण्यासाठी तलाठ्याकडे कागदपत्रे सादर केली. टॅक्स पावती न देता 7/12 फेरफार नोंद करण्यासाठी तलाठी प्रफुल्ल आरबाड यांनी तक्रारदाराकडे दहा हजार रुपये लाचेची मागणी पंचासमक्ष केली. त्यानंतर सोमवारी (दि.26) बीड एसीबीने सापळा लावला. लाचखोर तलाठी आरबाड व त्यासोबत सोबत खाजगी नजीरखान उमरद राजखान पठाण यांनी दुचाकीवर बसून तक्रारदारास त्यांच्या पाठीमागे येण्यास सांगितले. अंबाजोगाईतील शितल बिअरबार समोर गाडी थांबवून दुचाकीवर पाठीमागे बसलेले पठाणकडे पैसे देण्यास सांगितले. पठाणने पंचासमक्ष सात हजार रुपये लाच तक्रारदाराकडून स्वीकारली. तलाठ्यास लाचेची रक्कम मिळवून देण्यासाठी सहकार्य केले असता लाच रकमेसह रंगेहाथ पकडून दोघांना ताब्यात घेतले. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक डॉ.राहुल खाडे, अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे, बीड उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी निरीक्षक अमोल धस, पोलीस अमंलदार भरत गारदे, अविनाश गवळी, संतोष राठोड, चालक गणेश मेहत्रे यांनी केली.