घरकुल घरकुल करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणकर्त्याने प्राण सोडला!

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड


जिल्हा प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा नागरिकांतून संताप

बीड, दि.4 : घरकुल आणि इतर प्रश्नांच्या मागणीसाठी मागील काही दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुटुंबासह उपोषण सुरू होते. मात्र घरकुल… घरकुल… याची मागणी प्रशासनाच्या कानावर ऐकायला गेली नाही. अखेर या उपोषणकर्त्याचा उपोषण दरम्यान रविवारी (दि.4) पहाटे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात उपोषणाला बसलेल्या एका उपोषणार्थीकडे लक्ष द्यायला जिल्हाधिकारी आणि प्रशासनाला वेळ मिळाला नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या दारातच थंडीने कुडकुडत या उपोषणार्थी व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा जिल्हाभरातून संताप व्यक्त केला जात आहे.

उपोषणाची दैनिक कार्यारंभ अंकातील बातमी…

आप्पाराव भुजाराव पवार हे वासनावाडी येथील रहिवासी गेल्या दोन दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. शासनाने मंजूर केलेले घरकुल तातडीने बांधून देण्यात यावे, गायारान जमीन नावे करावी यासह इतर मागण्यांसाठी पवार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात उपोषण करत होते. मात्र या उपोषणावरती व्यक्तीची साधी दखलही घ्यायला जिल्हाधिकारी राधा विनोद शर्मा यांच्यासह प्रशासनाला वेळ मिळाला नाही. नेमकं जिल्हाधिकारी आणि त्यांचे सहकारी अधिकारी एवढ्या कोणत्या महत्त्वाच्या कामात व्यस्त होते, हे कळायला मार्ग नाही दरम्यान पवार यांचा सकाळी मृत्यू झाल्याचे उघड झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला असून नातेवाईकांनी आक्रोश केला आहे.

Tagged