zenda wandan

प्रजासत्ताक दिनी गावातील ध्वजारोहणाचा मान कुणाला?

बीड

नवनिर्वाचित सरपंचामध्ये संभ्रम; आचारसंहितेचा परिणाम

प्रदीप तरकसे /अंबाजोगाई : जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्यानंतर नवनिर्वाचित सरपंचांनी आपला पदभार स्वीकारला आहे. प्रजासत्ताक दिनी गावात होणार्‍या ध्वजारोहणाचा मान मिळेल की नाही अशी संभ्रमावस्था सरपंचामध्ये झाली आहे. कारण मराठवाडा शिक्षक मतदार संघाची निवडणूक लागल्याने संपूर्ण मराठवाड्यात आचारसंहिता लागू झालेली आहे. यामुळे ध्वजारोहण कोणी करावे याबाबत संभ्रम आहे. विशेष म्हणजे या संदर्भात शासनाच्या मार्गदर्शक सूचना मिळाल्या नसल्याने सर्वजण बुचकुळ्यात पडले आहेत.

बीड जिल्ह्यात 704 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक नुकतीच डिसेंबर महिन्यात पार पडली. निवडणूकीनंतर विजयी उमेदवारांनी आपल्या सरपंचपदाचा पदभार स्वीकारला. यामध्ये अनेक नवीन चेहर्‍यांसह तरुणांचा समावेश आहे. गावातील ग्रामपंचायतीचा ध्वजारोहण करणे हा प्रत्येक सरपंचाचा अभिमानाचा विषय असतो. सरपंच पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर लागलीच प्रजासत्ताक दिनी होणारा ध्वजारोहणाचा कार्यक्रम होत आहे. यामुळे ध्वजारोहण करण्यासाठी नवनिर्वाचित सरपंच मोठ्या उत्सूक आहेत. परंतु मराठवाडा शिक्षक मतदार संघाची निवडणूक जाहीर झाली असल्याने निवडणूक आयोगाने संपूर्ण मराठवाड्यात आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. येत्या 30 जानेवारीला शिक्षक मतदार संघाची निवडणूक होत आहे. त्यानुसार या काळात आदर्श आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीच्या सूचना देऊन त्यासाठी आयोगाने समिती सुद्धा स्थापन केलेली आहे. आदर्श आचारसंहितेमुळे नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच यांना झेंडावंद करता येईल का? शिवाय प्रजासत्ताक दिनी घेण्यात येणार्‍या विशेष ग्रामसभा घेता येईल का असा प्रश्न निर्माण झाला आहे. आचारसंहितेमुळे ग्रामपंचायत कार्यालया सोबतच शासकीय कार्यालय, शाळांमध्ये प्रशासकीय अधिकार्‍याकडून ध्वजारोहन की राजकीय पदाधिकार्‍यांना मान. प्रजासत्ताक दिनी होणार्‍या ध्वजारोहणाबाबत निर्माण झालेला संभ्रम प्रशासनान दूर करावा अशी मागणी सरपंच, उपसरपंच यांच्यातून होत आहे.

ध्वजारोहन करण्याबाबत वरीष्ठ कार्यालयाकडून काही सुचना प्राप्त झालेल्या नाहीत. आचारसंहीते मध्ये झेंडा राजकीय पदाधिकार्‍यांने फडकवू नये असे कुठेही सांगीतलेले नाही. फक्त भाषण करीत असतांना ते राजकीय नसावे व आचासंहितेचा भंग करणारे नसावे. त्यामुळे शिक्षक मतदारसंघाची आचासंहिता लागू असली तरी प्रजासत्ताक दिनी प्रचलीत पध्दतीने ध्वाजारोहण करण्यात येईल.

  • शरद झाडके (उपजिल्हाधिकारी, अंबाजोगाई)
Tagged