prakash solanke

अशोक शेजुळ हल्ला प्रकरणात आमदार प्रकाश सोळंके मंगला सोळंके रामेश्वर तवानी यांच्यावर गुन्हा दाखल

क्राईम

माजलगाव– भाजपा कार्यकर्ते अशोक शेजुळ यांच्यावर मंगळवारी धुलीवंदना दिवशी अज्ञात पाच ते सहा जणांनी लोखंडी रॉडने शाहूनगर भागात जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्यात अशोक शेजुळ गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर औरंगाबाद येथे उपचार सुरू आहेत. दरम्यान शेजुळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके त्यांच्या पत्नी मंगलताई सोळंके आणि रामेश्वर टवानी यांच्यासह इतर पाच ते सात जणांवर माजलगाव शहर ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.


भाजपा कार्यकर्ते अशोक शेजुळ यांनी सुंदरराव सोळंके टेक्स्टाईल पार्क आणि माजलगाव सहकारी साखर कारखाना प्रकरणात काही माहिती माहिती अधिकार अंतर्गत मागवलेली होती त्या अनुषंगाने त्यांनी संभाजीनगर हायकोर्टात याचिका देखील दाखल केलेली आहे. दरम्यान हल्लेखोरांनी हल्ला करतेवेळी अशोक शेजुळ यांना ‘तू लय प्रकाश सोळंकेच्या तक्रारी करतो का?’ असे म्हणत हा हल्ला केला होता असे शेजुळ यांनी तक्रारीत म्हटले आहे. या हल्ल्यात शेजुळ यांच्या दोन्ही पायांना दोन्ही हातांना आणि कमरेत गंभीर मार लागलेला आहे. त्यावरून पोलिसांनी अशोक शेजुळ यांची फिर्याद नोंदवून घेत बुधवारी सकाळी आमदार प्रकाश सोळंके त्यांच्या पत्नी मंगलताई सोळंके, टेक्स्टाईल पार्कचे अध्यक्ष रामेश्वर टवानी यांच्यावर भादंवी 307 120 ब कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. प्रकरणाचा अधिक तपास माजलगाव ठाण्याचे पोलीस निरीक्षक शितल कुमार बल्लाळ हे करीत आहेत.

Tagged