पडद्यामागचे हिरो : वाल्मिकअण्णा कराड

न्यूज ऑफ द डे बीड

ही कहाणी आहे ज्या शेतात आईसोबत खुरपले तेच शेत आईला विकत घेऊन देणार्‍या मातृभक्ताची. ही कथा आहे आपल्या स्वामीसाठी (मालक) इतरांना अंगावर घेत प्रसंगी स्वतः वाईट होणार्‍या सेवकाची. ही गोष्ट आहे तेजाब चित्रपट दहा वेळेस माधुरी दिक्षितसाठी बघून स्वतः प्रेमविवाह करणार्‍या पतीची. ही गोष्ट आहे आपण ज्या मार्गावरून गेलो त्यापासून आपल्या मुलांनी दूर रहावे यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार्‍या पित्याची. ही स्टोरी आहे काही मित्रांना न्याय देत नाही पण नको त्या लोकांना जवळ करतात असा आक्षेप असलेल्या मित्राची. आमदार धनंजय मुंडेंच्या अष्टप्रधान मंडळातील खंबीर सरदार, जे सर्वांवर असरदार ठरतात; त्या परम शिवभक्त कराड कुटुंबातील वाल्मिक अण्णांची!

परळी वैजनाथपासून सुमारे 10 किलोमीटरवर स्थित पांगरी गावांतील पारुबाई व बाबुराव या कराड दाम्पत्याच्या पोटी 29 जानेवारी 1969 रोजी वाल्मिक नावाचे पुत्ररत्न जन्मले. पण, तो मुलगा जेमतेम वर्षाचाचं असताना पित्याने दुसरे लग्न केल्याने आईसोबत मामाच्या घरी 10 बाय 10 पेक्षा लहान आकाराच्या एका पत्र्याच्या खोलीत वाढू लागला. पुढे पांगरी येथे 1 ली ते 7 वी असे प्राथमिक शिक्षण घेऊन 8 वी ते 10 वी पांगरीपासून पाच किलोमीटरवर असणार्‍या गाढे पिंपळगाव येथे दररोज पायपीट करून जिल्हा परिषदेच्या शाळेत पूर्ण केली. भारतीय जनता पक्षाच्या कमळाचे त्यांना एवढे आकर्षक होते की स्वतःकडे सायकल नव्हती आणि त्यांना सायकल चालवतासुद्धा येत नव्हती तेव्हा मित्राच्या सायकलला भारतीय जनता पक्षाचा झेंडा लावून सायकल हातात घेऊन हा पठ्ठ्या शाळेत जायचा. आई पारुबाई या रोजगार हमी योजनेच्या कामांवर खड्डे (बराशी) खोदून दोघांचा गुजराण करू लागल्या. त्याकाळात पाऊस आला की कित्येक दिवस झड लागायची, त्यामुळे ज्वारीच्या दाण्यात आधीच पीठ व्हायचे. तेच अन्न विना तक्रार छोटा वाल्मिक खात असे हे सांगताना पारुबाईंचे डोळे भरून आले होते. आजोळी रहात असून कधी मामाला किंवा आजोबांना काहीही मागायचे नाही कारण स्वाभिमान सर्वात महत्त्वाचा आहे ही शिकवण, हे संस्कार आईने केल्यामुळे कदाचित आजचे स्वाभिमानी करोडपती वाल्मिक कराड आपण बघत असू.
वाल्मिक यांना लहानपणापासून एकटे राहण्याची सवय होती. गावांत जिवाभावाचा मित्र म्हणजे माऊली पाटील अर्थात ज्ञानोबा भगवानराव मुंडे (यांचे घराणे तीन पिढ्यांनपासून पांगरीचे पोलीस पाटील आहे). पुढे महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी परळी गाठली. वैद्यनाथ कॉलेजमध्ये 11 वीत असतानाच त्यांची नजरानजर झाली ती मंजिली कदम यांच्याशी. गदिमा म्हणतात तसे ‘प्रथम तुझ पाहता जीव वेडावला उचलुनी घेतले नीज रथी मी’ असे वाल्मिक यांचे मंजिलींच्याबाबत झाले. गाण्यांची प्रचंड आवड असणार्‍या वाल्मिक यांना तोहफा, दिल, चांदनी चित्रपटातील गाणी तोंडपाठ आहेत. शाळेत असताना परळीतून व्हीसीआर भाड्याने आणून नाथरा, इंजेगांव आदी गावांच्या जत्रेत ते तिकीट घेऊन सिनेमा दाखवत हे सांगताना माऊली पाटील त्या दिवसांत केव्हा घेऊन गेले कळालेच नाही. तो काळ असेल 1988 -89 चा तेव्हा तेजाब चित्रपट प्रदर्शित झाला होता. एकाहून एक सरस गाणे असलेला तेजाब कित्येकदा बघितल्यावर वाल्मिक यांना मंजिली यांच्यातच त्यांची माधुरी दिसली असावी. मंजिली यांचे कुटूंब मूळ कोल्हापूरचे पण वडील थर्मलमध्ये नौकरीला होते त्यामुळे त्या परळीत होत्या. आज ज्या परळीचा शब्द कुठेही प्रमाण मानला जातो तिथे वाल्मिक कराडांचा शब्द प्रमाण आहे. मात्र, तेव्हा मंजिली यांनी वाल्मिक यांना होकार देण्यासाठी आठ – दहा महिने झुरवत ठेवले होते हे सांगताना मंजिली वहिनी खळखळून हसत होत्या. वहिनींच्या घरून विरोध असणे स्वाभाविक होते. एकतर आंतरजातीय विवाह त्यात वाल्मिक यांचेच खायचे वांदे असताना मुलीच्या घरून होकार तरी कसा मिळणार. पण, स्वामी समर्थांवर निस्सीम श्रद्धा असणार्‍या मंजिली वहिनींना वाल्मिक यांच्या कर्तृत्वावर दुर्दम्य विश्वास होता. सन 1988 – 89 मध्ये शिवाजी महाराज चौकात प्रथमच भगवानबाबा गणेश मंडळ स्थापन करून गणपती बसवला. कदाचित त्यांच्या वैवाहिक- सामाजिक – राजकीय जीवनाचा हा श्रीगणेशा ठरला.
गजानन कृपेने जगदंबेची सेविका मंजिली व वैद्यनाथाचा सेवक वाल्मिक यांचा सन 1990 साली विवाह संपन्न झाला. इकडे आई पारुबाईंना काहीच कल्पना नव्हती, गावातले लोक वाट्टेल ते बोलत होते. त्यावेळी चार दिवस पारुबाई मुलाच्या काळजीने दार बंद करून देवाचा धावा करत होत्या. त्यानंतर वाल्मिक घरी आले ते त्यांची अर्धांगिनी झालेल्या मंजिली यांना सोबत घेऊनच. दरम्यानच्या काळात लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे परमार कॉलनीत भाड्याने रहात होते. तेव्हा त्यांचे मित्र फुलचंद कराड यांनी वाल्मिक यांना त्यांच्याकडे काम मिळवून दिले. त्यांच्या घरात आपलेच घर समजून पडेल ते काम वाल्मिक कराडांनी केले. सर्वात पहिले विश्वास संपादन केला तो गोपीनाथराव मुंडेंच्या पत्नी अर्थात प्रज्ञा काकूंचा. घरात दूध, भाजीपाला, किराणा आणण्यापासून वाल्मिक यांनी कसलीच लाज न बाळगता काम केले. कोणतेच काम छोटे नसते हे चांगलेच जाणून असलेले वाल्मिक त्यामुळेच गोपीनाथरावांच्या कुटुंबाचा अविभाज्य घटक झाले.
याकाळात कंडक्टर कॉलनीत भाड्याने खोली केलेल्या वाल्मिक यांना 4 जुलै 1992 रोजी सुशील नावाचे पुत्ररत्न प्राप्त झाले. या काळात वाल्मिक व त्यांच्या मित्रांनी थर्मलमध्ये काही हजारांचे लहानसहान कंत्राट मिळवायला सुरुवात केली. त्यावेळी माऊली पाटील यांच्यासह सुनील फड, सुरेश गित्ते आदी पंधरा जणांचा जीवाला जीव देणारा ग्रुप तयार झाला ज्याची एकप्रकारे जरब परळीत निर्माण झाली. 1993 – 1995 दरम्यान वैद्यनाथ कॉलेजच्या संचालक मंडळाची निवडणूक झाली होती. गोपीनाथरावांच्या पॅनलचे सात सदस्य निवडून आले होते तर विरोधात असणार्‍या प्रा. टी. पी. मुंडेंचे 23 सदस्य जिंकले होते. त्यामुळे अध्यक्ष टी. पी. मुंडेंचा होणार हे स्पष्ट होते. जिंकलेल्या सदस्यांतून अध्यक्ष निवडले जाण्यासाठी सर्वसाधारण सभा सुरू झाली त्यात तुंबळ हाणामार्‍या सुरू झाल्या तेव्हा गोपीनाथरावांच्या बाजूने असणार्‍या वाल्मिक कराड यांच्या पायात तत्कालीन पोलीस अधिकारी नागरगोजे यांच्या पिस्तूलातून निघालेली गोळी घुसली. त्यांच्यावर अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात महिना – दीड महिना उपचार सुरू होते. तेव्हा आई पारुबाई, पत्नी मंजिली यांच्यासह फुलचंद कराड यांचे बंधू सुभाष व मित्र माऊली पाटील यांनी सारे काही केले.

स्वामीनिष्ठ वाल्मिकअण्णा
याच काळात गोपीनाथरावांचे जेष्ठ बंधू पंडितअण्णा मुंडे व धनंजय मुंडे यांच्या सहवासात वाल्मिक कराड आले. धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता युवा मोर्चाची पहिली शाखा वाणटाकळी येथे सुरू केली ती वाल्मिक कराड व त्यांच्या मित्रांनीच. अटलजींच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या बीड जिल्ह्यातील संदेश यात्रेची धुरा धनंजय मुंडेंकडे होती तेव्हा त्याचे नियोजन वाल्मिक कराड यांनीच केले. युती पार्ट वनच्या काळात धनंजय मुंडेंसोबत माऊली पाटील व वाल्मिक कराड असायचे. गोपीनाथराव उपमुख्यमंत्री असताना वाल्मिक कराड व त्यांच्या मित्रांना सत्ता काय असते हे उमगलेलेच नव्हते. त्यांना सत्तेचे बाळकडू दिले पंडितअण्णांनी. सन 2001 मध्ये नगर परिषद निवडणुकीच्या तिकीट वाटपाची बैठक भाजपचे जेष्ठ नेते विकासराव डुबेंच्या घरी झाली होती, त्या बैठकीत गोपीनाथरावांचा विरोध झुगारून पंडित अण्णांनी वाल्मिक कराड यांना नगरसेवक पदाचे तिकीट दिले. अण्णांचा विश्वास सार्थ ठरवत वाल्मिक निवडणूक जिंकून नगर परिषदेचे उपाध्यक्ष झाले. काहीकाळ प्रभारी नगराध्यक्ष पदीसुद्धा त्यांची वर्णी लागली. सन 2002 मध्ये पंडितअण्णा बीड जिल्हा परिषद अध्यक्ष झाले. स्वतः धनंजय मुंडेदेखील जिल्हा परिषदेत गेले, त्यावेळी पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये वाल्मिक कराड यांना बेदम मारहाण झाली होती. मुंडे कुटुंबियांसाठी प्रसंगी उपवास, व्रतवैकल्येदेखील वाल्मिक कराड यांनी केले आहेत, करत आहेत. गेले कित्येक वर्षे ते एकवेळच जेवतात हे किती जणांना ठाऊक असेल माहिती नाही.

वाल्मिक ते वाल्मिक अण्णा
जसे नरेंद्र मोदींसाठी अमित शहा आहेत तसे धनंजय मुंडेंसाठी वाल्मिक कराड आहेत. वाल्मिक कराड नगराध्यक्ष झाल्यावर त्यांची मित्र मंडळी त्यांना प्रेमाने अण्णा अशी हाक मारू लागली. जेव्हा 2009 साली धनंजय मुंडेंना विधानसभेचे तिकीट मिळाले नाही म्हणा किंवा डावलले गेले म्हणा धनंजय मुंडेंच्या आई वडिलांइतके दुःख वाल्मिक कराड यांना झाले होते असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. तेव्हा धाय मोकलून हा खंबीर सरदार ढसाढसा रडला होता.

टास्क मास्टर
तरुणपणी अंगात रग असताना परिस्थितीची गरज म्हणून निर्भीडपणे वागणारे वाल्मिक कराड गेल्या अनेक वर्षांपासून परळी वैजनाथच्या पंचक्रोशीत असले की न चुकता बस स्टँडवरील गणपती मंदिर व प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनाला दिवसांतून दोनवेळा दर्शनासाठी जातात. अण्णांच्या घराचे नावंदेखील श्रीगणेश आहे. अण्णांचं मॅन मॅनेजमेंट स्किल अफलातून आहे. बहुतेकजण त्यांना वचकून असतात. बहुतेक करून प्रेमाने ते समोरच्याला आपलेसे करतात अन्यथा साम -दाम -दंड -भेद यांचा वापर करायला ते चुकत नाहीत. त्यांना टास्क मास्टर म्हटले तर वावगे ठरू नये. पडद्यामागचे खरे हिरो आहेत ते वाल्मिकअण्णा कराड. अहोरात्र मेहनत करून थकले की अण्णा दोन दिवस न खाता पितासुद्धा झोपू शकतात. वाल्मिक कराड यांच्या नावाचा अनेकजण गैरवापर करतात. वास्तवात प्रत्यक्षापेक्षा प्रतिमा खूप डागळलेली आहे ती अण्णांवर जळणार्‍या त्यांच्या हितचिंतकांमुळे. पण, अण्णा याला भीक घालत नसले तरी जे भोग आपल्या वाट्याला आले ते आपल्या मुलांच्या वाट्याला येऊ नयेत म्हणून हा बाप आता काळजी घेऊ लागलेला आहे. स्वतः पूर्णपणे निर्व्यसनी व शाकाहारी असलेले अण्णा राजकीय सागरात पट्टीचे जलतरणपटू आहेत, पण प्रत्यक्षात त्यांना पाण्याची प्रचंड भीती वाटते.

अण्णांनी उपयोगिता मूल्य असणार्‍या मित्रांपेक्षा उपद्रव देणार्‍यांना जवळ केल्याचा आक्षेप त्यांचे मित्र घेतात. त्यांच्या मित्रांच्या म्हणण्यानुसार आता वेळ आली आहे सर्वांना समान न्याय देत सर्वांना आपलेसे करत हातातील लगाम घट्ट पकडून, आपली मांड खंबीर ठेवत धनंजय मुंडेंना बळ द्यायची. राजकारणात सावलीसुद्धा दगा देते म्हणून मी धनंजय मुंडे व वाल्मिक कराड यांना दो जिस्म एक जान असे म्हणेन. धनंजय मुंडेंचा लकी नंबर 7 आहे असे म्हणतात, त्यांच्या सर्व गाड्यांचे नंबर 7 आहेत तर वाल्मिक यांच्या गाड्यांचे नंबर 1717 आहेत. थोडक्यात धनंजय यांच्या 7 = साथ ला प्रतिसाद देत अण्णा 1717 = एक साथ एक साथ अशी वाटचाल करत आहेत.

-अनिरुद्ध जोशी, परळी वैजनाथ
संपर्क क्रमांक : 8983555657

Tagged