महिलांना मारहाण करत मंदिरात चोरी!

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

बीड दि.26 : तालुक्यातील अंजनवती येथील येडे वस्तीवरील श्री संत तुकाविप्र संस्थान मंदिरात बुधवारी (दि.26) पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दार तोडून प्रवेश केला, प्रतिकार करणाऱ्या दोन महिलांना मारहाण करत ऐवज लुटला. जखमी महिलांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी नेकनुर पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा यांनी धाव घेतली. तसेच श्वानपथकासही पाचारण करण्यात आले.

बीड तालुक्यातील अंजनवती येथे येडे वस्तीवर संस्थान आहे. येथील पुजारी कृष्णा जोशी झोपलेले असताना त्यांच्या रूमला बाहेरून कडी लावली. शेजारच्या रूममध्ये झोपलेल्या त्यांच्या पत्नी गीता जोशी (वय ४५) यांना मारहाण केली. तसेच त्यांच्या सासु उषा प्रल्हाद लेले यांच्या उजव्या कानाच्या पाठीमागे डोक्याला मारहाण केली. जखमी महिलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चोरट्यांनी दिड तोळे सोने व काही रक्कम लंपास केल्याचे पोलिसांना सांगितले आहे. घटनास्थळी नेकनुर ठाण्याचे सहायक निरीक्षक शेख मुस्तफा, उपनिरीक्षक विलास जाधव, हवालदार राख तसेच लिंबागणेश पोलिस चौकीचे .नागरगोजे, हवालदार सचिन डिडुळ घटनास्थळी ठाण मांडून आहेत. तर स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक भगतसिंग दुल्लत व त्यांची टीम तसेच श्वानपथक दाखल झाले असून पुढील तपास शेख मुस्तफा करत आहेत.

Tagged