४ संचालक बिनविरोध, इतरांच्या निवडीकडे लक्ष
बीड : परळी तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मुंडे बहिण- भावांनी संघर्ष टाळण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक जवळपास बिनविरोध होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत ४ संचालकांच्या निवडी बिनविरोध म्हणून निश्चित झाल्या आहेत.
परळी मतदारसंघातील प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपचे नेते पंकजा मुंडे आणि माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे हे आमने-सामने येतात. परंतु वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत त्यांनी संघर्ष टाळला आहे. या निवडणुकीत भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसत गेलेल्या एकाही स्थानिक नेत्याला मुंडे बहीण-भावाने उमेदवारी दिली नाही. त्यामुळे पक्षांतर करणारे सर्वच नेते कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणुकीपासून वंचित राहिले आहेत. पुढील काळात कारखान्यावर पंकजा मुंडे यांची सत्ता राहणार असून त्यांना धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखालील निवडण्यात येणारे संचालक सहकार्य करतील. कारखान्याच्या निवडणुकीची घोषणा झाल्यापासून मुंडे बहीण -भाऊ एकत्र येणार, अशा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होत्या. अखेर ते दोघे एकत्र आले असून आता चर्चांना पूर्णविराम मिळणार आहे.
कारखाना निवडणुकीत असं ठरलं
कारखान्याच्या संचालक मंडळातील २१ पैकी ११ जागा विद्यमान चेअरमन पंकजा मुंडे यांच्या गटाला तर १० जागा धनंजय मुंडे यांच्या गटाला देण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. ठरल्याप्रमाणे परळी वैजनाथ सहकारी साखर कारखान्याच्या ऊस उत्पादकांच्या नाथरा गटातून राजेश हरिश्चंद्र गित्ते, सतीश तुकाराम मुंडे, अजय माणिकराव मुंडे या तिघांनी तर सहकारी संस्था (उत्पादक, बिगर उत्पादक, पणन प्रतिनिधी) गटातून सत्यभामा उत्तम आघाव अशी चौघांची निवड झाली आहे. दरम्यान, २१ संचालकांच्या निवडीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी एकूण ५० जणांनी अर्ज दाखल झाले होते. आज अर्ज छाननीच्या दिवशी आतापर्यंत ४ जागांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. उर्वरित अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू आहे. यासंदर्भात प्रशासकीय यंत्रणा काम करत आहेत.