बीडमध्ये शासकिय कार्यालयात पिण्याच्या पाण्याचा ठणठाणाट!

न्यूज ऑफ द डे बीड

BEED दि.29 : येथील जिल्हाधिकारी, तहसिल, सामाजिक न्याय भवन, बसस्थानक आदी शासकिय कार्यालयात पिण्याच्या पाण्याचा ठणठाणाट पहायला मिळत आहे. फिल्टरसह इतर उपकरणांसाठी लाखोंचा खर्च करुन विकतचे पाणी घेण्याची वेळ आली आहे. अधिकारी, कर्मचार्‍यांच्या पिण्याच्या पाण्याची अशी अवस्था असेल तर सहाजिकच नागरिकांनाही 15 ते 20 दिवसाला पाणी मिळत आहे. 40 अंशाच्या पुढे तापमान असताना पाण्यासाठी नागरिकांचे हाल होत आहेत. (Drinking water in the government office in Beed is frozen!)

जिल्हा व नगरपरीषद प्रशासनाच्या अनागोंदी कारभार व ढिसाळ नियोजनाच्या निषेधार्थ व तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी, यासाठी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे (Dr.ganesh dhawale) यांच्या नेतृत्वाखाली सोमवार, 29 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोफत बाटली बंद पाणी वाटप आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनात शेख युनुस, बलभीम उबाळे, शेख मुबीन, शेख मुस्ताक, रामनाथ खोड आदींचा सहभाग होता. यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

फिल्टरचे साहित्य भंगारमध्ये पडले
जिल्हाधिकारी कार्यालयात अनेक विभाग असून या ठिकाणी रोज हजारो सामान्यांची आवक जावक असते. मात्र या ठिकाणी सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. विविध महसूल विभाग आणि तहसिल कार्यालय असलेल्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत देखील हीच अवस्था आहे. ईमारतीच्या पाठीमागील हौद अनेक वर्षांपासून कोरडाठाक असून याठिकाणी बसविण्यात आलेले फिल्टर भंगार झाले आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या ईमारतीत देखील पाण्याचा ठणठणाट आहे.

बसस्थानकात प्रवाशांना
बाटलीतील विकतचे पाणी

उन्हाळ्याच्या दिवसात तापमानात वाढ होत असतानाच बसस्थानकात ये-जा करणार्‍या हजारो प्रवाशांना विकतचे बाटलीबंद पाण्यावर तहान भागवावी लागते. सर्वसामान्य प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. तसेच येथे विक्री केली जाणारी पाणी बॉटल ही चढ्यादराने विक्री केली जाते, त्यावरही कुणाचाच अंकुश राहिलेला दिसत नाही.

लाखोंचा खर्च मातीत
शासकीय कार्यालयात पिण्याच्या पाण्याची सोय व फिल्टर आदि उपकरणांसाठी लाखोंचा खर्च करण्यात येतो. मात्र ही उपकरणे धुळखात वर्षोनुवर्षे पडून आहेत. मुळात पाण्याची सोय नसल्यामुळे या उपकरणांचा काहीच उपयोग नाही त्यामुळे कंत्राटदार पोसण्यासाठी जनतेच्या पैशाचा अपव्यय केला आहे का? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.

बीड नगरपरीषदेचे ढिसाळ
नियोजन नागरिकांच्या मुळावर

बीड नगरपरीषदेच्या ढिसाळ नियोजनामुळे बीड शहरातील नागरिकांना तब्बल 15-17 दिवस पाणी पुरवठा होत नाही. विद्युत पुरवठा व मुख्य पाईप लाईनला जागोजागी लिकेज यामुळे पाणी असुनही कडक उन्हाळ्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. तातडीने उपाययोजना करण्यात येऊन सुरळीत पाणीपुरवठा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

Tagged