death

सीसीटीव्हीमध्ये स्वतःला पाहताच जरीनखान जमीनीवर कोसळला!

क्राईम न्यूज ऑफ द डे परळी


मृत्यू प्रकरणाचा सीआयडीकडून तपास सुरु तर चोरीच्या गुन्ह्याचा तपास एलसीबीकडे वर्ग
बीड
दि.17 : परळी शहरात झालेल्या चोरीच्या गुन्ह्यात जरीनखानचा सहभाग दिसून आल्याने पोलीसांनी त्यास ताब्यात घेतले. ठाण्यात आणल्यानंतर सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्वतः दिसत असल्याचे पाहताच जरीनखानने हातपाय गाळले. तो नेहमीप्रमाणे नाटक करत असावा असा संशय पोलीसांना आला. परंतू अधिकच त्यास त्रास होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर परळी शहर पोलीसांनी तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. परंतू त्यापुर्वीच जरीनखानचा मृत्यू झाला होता. हृदयविकाराने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून प्रकरणाचा तपास सीआयडी करत आहे. तर चोरीच्या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

जरीन खान सुजात अली खान (वय 48 रा.मलीकपुरा ता.परळी) (jarin khan sujat ali khan) असे मयताचे नाव आहे. परळी शहरात व्यापार्‍याच्या पैशाची बॅग चोरी झाल्याची घटना घडली होती. गर्दीच्या ठिकाणी रात्री नऊ वाजता चोरी होणे गंभीर बाब असल्याचे सांगत पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी परळी शहर पोलीसांना आरोपी शोधण्यासाठी सूचना दिल्या होत्या. तीन दिवसाच्या तपासानंतर परळी शहर पोलीसांनी उस्मानखान पठाण यास ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली देत यामध्ये जरीन खान मास्टरमाईंड असल्याचे सांगितले. त्यावरुन पोलीसांनी जरीन खान यास ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याचा मृत्यू झाला. या मृत्यू प्रकरणाचा तपास सीआयडी करत असून चोरीच्या गुन्ह्याचा तपास परळी शहर पोलीसांकडून स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

जरीनखान पठाणवर सात गुन्हे
जरीनखान सुजातअली खान पठाण यावर जालना पोलीस ठाण्यात 395, 411, परळी शहर ठाण्यात 379, परळी शहर ठाण्यात 380, परळी शहर ठाण्यात 457, 380, परळी ग्रामीण ठाण्यात 12 (अ) मजुका, परळी ग्रामीण कलम 4, 5 मजुका अशी गुन्हे दाखल आहेत.

फरार दोन आरोपी पोलीसांच्या रडारवर
या प्रकरणात रेकी करण्यासाठी उस्मानखान पठाण होता. रेकी करण्यासाठी त्याला जरीनखान पठाण ने 15 हजार रुपये दिल्याचे सांगत अन्य दोन आरोपीच्या मदतीने पैशाची बॅग लुटल्याची कबुलीही त्याने दिली आहे. त्या अन्य दोन आरोपीच्या मागावर पोलीस असून लवकरच त्यांना अटक केली जाणार आहे. उस्मानखान पठाण सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

Tagged