court

पैशासाठी पत्नीचा खून करणार्‍या पतीस जन्मठेप!

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड


चौथे अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निकाल; जेबापिंप्री येथील घटना
बीड
दि.12 : टेलरिंगचे दुकान टाकण्यासाठी माहेरहून 50 हजार रुपये घेऊन ये म्हणून छातीवर गुप्तीने वार करुन पत्नीचा खून केल्याप्रकरणी आरोपी पतीस दोषी ठरवत त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. येथील चौथे अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.एस.पाटील यांनी बुधवारी (दि.12) ही शिक्षा सुनावली.

शिवाजी महादेव फाटक (रा.जेबापिंप्री, ता.बीड) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. 21 वर्षांपूर्वी नेकनूर ठाणे हद्दीत ही घटना घडली होती. मुंबईच्या प्रभा रमेश बोरकर यांची मुलगी सुरेखा हिचा विवाह शिवाजी फाटक याच्यासोबत झाला होता. लग्नानंतर पंधरा दिवसांनीच पती शिवाजी फाटक, सासरा महादेव फाटक, सासु द्वारकाबाई फाटक, नणंद सिमा यांनी तिचा माहेरहून टेलरिंगचे दुकान टाकण्यासाठी 50 हजार रुपये घेऊन ये म्हणून छळ सुरु केला. 24 ऑक्टोबर 2002 रोजी दुपारी शिवाजी फाटक याने सुरेखा हिच्या छातीत गुप्तीने वार करुन तिचा खून केला. प्रभा बोरकर यांनी 25 ऑक्टोबर 2002 रोजी याबाबत नेकनूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यावरुन शिवाजी फाटक व इतरांवर खुनासह इतर कलमांन्वये गुन्हा नोंद झाला. तत्कालिन उपनिरीक्षक एम. आर.गरुड यांनी तपास करुन आरोपी विरुद्ध येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. तपास अधिकारी बी.बी. जाधव यांनी पुरवणी दोषारोप पत्र दाखल केले. चौथे अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.एस. पाटील यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. सरकारपक्षातर्फे प्रकरणात 12 साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षाने सादर केलेले पुरावे, साक्षी व सरकारी वकिलांचा युक्तीवाद यावरुन न्यायाधीश आर.एस. पाटील यांनी आरोपी शिवाजी महादेव फाटक जन्मठेप व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच दंड न भरल्यास एक वर्ष साध्या कैदेची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकिल अ‍ॅड.मंजुषा दराडे यांनी काम पाहिले. त्यांना सरकारी वकील बी.एस.राख, अ‍ॅड. अजय तांदळे यांनी सहकार्य केले. पैरवी अधिकारी म्हणून परमेश्वर सानप, एम.बी. मिसाळ, फौजदार जायभाये यांनी काम पाहिले.

Tagged