विद्यार्थ्यांची पुरेशी झोप होत नसल्याने घेतला निर्णय
बीड, दि.8 : बदलत्या जीवनशैलीमुळे शालेय विद्यार्थ्यांची झोप पूर्ण होत नसल्याने शासनाने आज चौथीपर्यंतच्या शाळांच्या वेळा बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता सकाळच्या सत्रातील शाळा 7 ऐवजी सकाळी नऊ किंवा त्यानंतर भरविल्या जाणार आहेत. याबाबत शासन निर्णय देखील निर्गमीत करण्यात आला आहे.

राज्यपाल रमेश बैस यांनी गेल्या वर्षी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात केलेल्या भाषणात प्राथमिक वर्गांच्या लवकर वेळेबाबत नाराजी दर्शवली होती. त्यानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून हे पाऊल उचलण्यात आले. ज्या शाळांमध्ये पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीच्या वर्गांची वेळ सकाळी 9 वाजेपूर्वी आहे, त्यांनी त्यांच्या वेळा बदलून सकाळी 9 वाजता किंवा नंतर वर्ग सुरू करावेत. ज्या शाळा व्यवस्थापनांना त्यांच्या वेळेत बदल करणे कठीण वाटत असेल त्यांनी संबंधित जिल्हा शिक्षणाधिकार्यांशी संपर्क साधून मार्ग शोधावा असं परिपत्रकात म्हटले आहे.
शिक्षण हक्क कायदा 2009 मध्ये विहित केलेल्या अध्यापन तासांचे पालन करण्यात शाळांना अडचण येऊ नये, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे. राज्यपालांच्या सूचनांचा संदर्भ असलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, उशिरा झोपणे, मोठ्या आवाजात संगीत आणि मनोरंजनाच्या विविध माध्यमांमुळे जीवनशैलीत बदल झाले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना पुरेशी आणि योग्य झोप मिळत नाही. त्याचा विद्यार्थ्यांच्या उत्साहावर विपरीत परिणाम होतो, असे परिपत्रकात म्हटले आहे.

शाळा आणि कार्यलयाच्या वेळा समांतर येऊ नये
यानुसार शाळेच्या वेळेत बदल करताना शहरातील शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या वेळा व शाळांच्या वेळा समांतर येणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे. अन्यथा शहरी भागात वाहतुकीच्या मोठ्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. यानुसार शाळांच्या वेळेत बदल करताना दोन सत्रामध्ये भरणार्या शाळांनी नियोजन करताना किमान प्राथमिक स्तरातील विर्द्यार्थ्यांसाठी दुसर्या सत्राचा विचार करावा.