पोलीसांचा निष्काळजीपणा; सराईत दरोडेखोराचे पोलीस ठाण्यातून पलायन

अंबाजोगाई क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

बीड दि.2 : अंबाजोगाई येथील दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपीला तब्बल सहा वर्षानंतर स्थानिक गुन्हे शाखेने मोठ्या शिताफीने गजाआड केले होते. त्यानंतर या आरोपीस अंबाजागाई शहर पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले. मात्र अंबाजोगाई शहर पोलीसांच्या निष्काळजीपणामुळे सदरील आरोपीने ठाण्यातून पलायन केले आहे. ही घटना 1 सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली असून आरोपीच्या शोधार्थ दोन पथके रवाना करण्यात आली आहेत.
समाधान वैरागे (32,रा.जवळबन ता.केज) असे त्या आरोपीचे नाव आहे. 2016 मध्ये अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पेट्रोलपंपावर दरोडा पडला होता. या गुन्ह्यात त्याचा सहभाग होता. मात्र, पोलिसांना तो सापडत नव्हता. दरम्यान, तो जवळबन येथे असल्याची माहिती मिळाल्यावरुन 1 सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक सतीश वाघ यांनी उपनिरीक्षक संतोष जोंधळे यांच्या नेतृत्वाखाली पथक रवाना केले. या पथकाने दिवसभर पाळत ठेऊन सायंकाळी समाधान वैरागे याच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान, वैद्यकीय तपासणी करुन त्यास अंबाजोगाई शहर पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर पथक निघून आले. ठाणे अंमलदाराच्या खुर्चीजवळ बसलेल्या समाधान वैरागे याने पोलीस कामात व्यस्त असल्याची संधी साधत रात्री साडेआठ वाजता ठाण्यातून पलायन केले. तो पळून गेल्याने ठाण्यात एकच गोंधळ उडाला. गुन्हे शाखेने मोठ्या शिताफीने पकडलेला आरोपी शहर पोलिसांच्या ताब्यातून पळाल्याने खळबळ उडाली आहे. समाधान वैरागे हा हिस्ट्रीशीटर असून त्याच्यावर दरोड्यासारखे गंभीर गुन्हे नोंद आहेत. त्याच्या शोधासाठी गुन्हे शाखा व शहर पोलीस ठाण्याचे एक अशी दोन पथके रवाना करण्यात आली आहेत. गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक सतीश वाघ व अंबाजोगाई शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार या पथकांच्या संपर्कात आहेत.

Tagged