aaropi

अंबाजोगाई ठाण्यातून पळालेल्या ‘त्या’ दरोडेखोरास केज पोलिसांनी पकडले!

अंबाजोगाई केज क्राईम न्यूज ऑफ द डे


बीड दि.2 : अंबाजोगाई येथील दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपीला तब्बल सहा वर्षानंतर स्थानिक गुन्हे शाखेने मोठ्या शिताफीने गजाआड केले होते. त्यानंतर या आरोपीस अंबाजागाई शहर पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले. मात्र अंबाजोगाई शहर पोलीसांच्या निष्काळजीपणामुळे सदरील आरोपीने ठाण्यातून पलायन केले आहे. त्यानंतर काही तासातच केज पोलिसांनी या आरोपीस जेरबंद केले आहे. हा आरोपी पुण्याला जाण्याच्या तयारीत होता.
समाधान वैरागे (32,रा.जवळबन ता.केज) असे त्या आरोपीचे नाव आहे. 2016 मध्ये अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पेट्रोलपंपावर दरोडा पडला होता. या गुन्ह्यात त्याचा सहभाग होता. मात्र, पोलिसांना तो सापडत नव्हता. दरम्यान, तो जवळबन येथे असल्याची माहिती मिळाल्यावरुन 1 सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक सतीश वाघ यांनी उपनिरीक्षक संतोष जोंधळे यांच्या नेतृत्वाखाली पथक रवाना केले. या पथकाने दिवसभर पाळत ठेऊन सायंकाळी समाधान वैरागे याच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान, वैद्यकीय तपासणी करुन त्यास अंबाजोगाई शहर पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर पथक निघून आले. ठाणे अंमलदाराच्या खुर्चीजवळ बसलेल्या समाधान वैरागे याने पोलीस कामात व्यस्त असल्याची संधी साधत रात्री साडेआठ वाजता ठाण्यातून पलायन केले. तो पळून गेल्याने ठाण्यात एकच गोंधळ उडाला होता. त्याच्या शोधात दोन पथके रवाना करण्यात आली होती. मात्र केज पोलिसांनी या आरोपीला पुण्याला जाण्याच्या तयारीत असताना केज पकडले. ही कारवाई केज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी अशोक नामदास, शेख मतीन यांनी केली. या आरोपीस पुन्हा अंबाजोगाई शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे.

Tagged