कठोर निर्बंध काही प्रमाणात शिथिल करा

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

आ.सतीश चव्हाण यांची मागणी
औरंगाबाद : राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’ मोहिमेअंतर्गत लागू केलेले कठोर निर्बंध काही प्रमाणात शिथिल करावेत अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी आज दि.९ राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, राज्यात काही दिवसांपासून कोरोनाची दुसरी लाट आली असून कोरोना बाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस प्रचंड वेगाने वाढत आहे. कोरोनाची ही लाट थोपविण्यासाठी राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’ मोहिमेअंतर्गत किराणा, मेडिकल अशी अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकाने दि.5 ते 30 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयाच्या विरोधात व्यापारी व सर्व सामान्य जनतेतून मोठ्या प्रमाणात रोष निर्माण होत आहे. या नव्या निर्बंधामुळे व्यापारी व सर्व सामान्य जनतेच्या मनामध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. नव्या निर्बंधात लग्नासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र लग्नासाठी आवश्यक असणारे नवीन कपडे, दागिने, घरभांडी व इतर साहित्यांची दुकाने मात्र बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे लग्नासाठी खरेदी करायची कशी? असा प्रश्न वधु-वर पक्षासमोर उभा राहिला आहे. तसेच उद्योग कंपन्यांना उत्पादन सुरू ठेवण्याची मुभा दिली आहे. मात्र कंपन्यांतील उत्पादने विक्री करणारी दुकाने आणि शो रूम बंद ठेवण्यात आली आहे. बांधकांमांना परवानगी आहे. परंतु बांधकामासाठी लागणारी साहित्यांची दुकाने मात्र उघडण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे बांधकाम करायचे कसे? असे अनेक बाबतीत झाले असून या नव्या निर्बंधामुळे मोठी अडचण निर्माण झाली असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी म्हटले आहे. कोरोनाची लाट थोपविण्यासाठी गर्दी टाळण्याच्या उद्देशाने आपण हे कडक निर्बंध घालून दिले असले तरी या निर्णयामुळे सर्व सामान्य जनतेसह छोटे -मोठे व्यावसायिक, व्यापारी, कष्टकरी, मजूर हवालदिल झाले आहेत. व्यवसाय नाही, कर्जाचे हप्ते, विजेचे बील, जागेचे भाडे हे खर्च दुकान बंद ठेवूनही सुरूच राहणार आहे. त्यामुळे हे 25 दिवस काढायचे कसे? असा प्रश्न या वर्गासमोर उभा राहिला आहे. शिवाय, यामाध्यमातून अनेकांचा रोजगार बुडत असून त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. याचा देखील विचार होणे गरजेचा आहे. गतवर्षी सलग चार महिन्याच्या ‘लॉकडाऊन’मुळे सर्वच वर्ग, क्षेत्र होरपळून निघाले होते. त्यामुळे परत आता ‘लॉकडाऊन’ कुणालाच नको आहे. त्यामुळे राज्य सरकारने सरसकट बंद करण्याऐवजी निवडक वेळेत दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, त्यामध्ये कामगारांचे लसीकरण, आरटीपीसीआर चाचणी, मर्यादित संख्येनेच ग्राहकांना प्रवेश, सॅनिटायझेशन, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांची कडक अंमलबजावणी करणे असे निर्बंध आणता येतील. व्यापारी, छोटे मोठे व्यावसायिक देखील हे नियम पूर्णपणे पाळण्यास तयार आहेत. त्यामुळे राज्य सरकारने लागू केलेले कठोर निर्बंध काही प्रमाणात शिथिल करून सरसकट 25 दिवस दुकान बंदीचा फेरविचार करावा अशी मागणी आ.सतीश चव्हाण यांनी केली आहे.

Tagged