VINAYAK METE

अशोक चव्हाण यांची हकालपट्टी करा-आ.विनायक मेटे

बीड महाराष्ट्र

बीड- मराठा आरक्षण उपसमितीची आरक्षण मिळवून देण्याची जबाबदारी होती. या समितीचे अध्यक्ष मंत्री अशोक चव्हाण हे आहेत. मात्र त्यांनी आरक्षणाचा प्रश्न गांभिर्याने घेतलाच नाही. आरक्षण प्रश्नात काय केलं जावं, कोर्टात कशी भुमिका मांडली जावी याबाबतही त्यांनी कधी चर्चा केली नाही. आम्ही हजारदा त्यांना काही गोष्टी समजावून सांगत होतो. पण ते स्वतः प्रस्थापित असल्याने त्यांना गरीब मराठ्यांना आरक्षण द्यावे असे कधीच वाटले नाही. त्यांच्यामुळेच सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकले नाही. मुख्यमंत्र्यांनी अशा नालायक, मुर्ख माणसाची उपसमितीवरून आणि मंत्रिमंडळातून हाकालपट्टी करावी, अशी मागणी आ.विनायक मेटे यांनी बीड येथे आयोजित मराठा क्रांती संघर्ष मोर्चात केली.

आ. मेटे म्हणाले, हा मावळा कधी कुणाच्या अंगावर जात नाही. पण कुणी आडवा आला तर त्याला शिंगावर घेतल्याशिवाय राहत नाही. आज कोरोनाची भिती असली तरी हा समाज कोरोनाची भिती मनात न ठेवता रस्त्यावर उतरला आहे. त्याला त्याच्या भविष्याची चिंता आहे. आज जसा तो रस्त्यावर उतरला आहे तसा तो सरकारला रस्त्यावर आणल्याशिवाय देखील राहणार नाही. त्यामुळे सरकारने आमचा हा आक्रोश समजून घ्यावा, सर्वात आधी अशोक चव्हाण यांची हकालपट्टी करावी. कारण गरीब मराठ्यांसाठी गढीवाले, माडीवाले, श्रीमंत कधीच संघर्ष करू शकत नाहीत. आमची लढाई आता आम्हालाच लढावी लागेल. स्व.अण्णासाहेब पाटील यांनी सुरु केलेली आरक्षणाची मागणी अशोक चव्हाण यांच्या बापाने देखील कधी पूर्ण केली नव्हती. उलट त्यांच्या कार्यकाळात स्व.अण्णासाहेब पाटलांना दुसर्‍या दिवशीचा सूर्य देखील बघावा वाटला नाही. त्यामुळे त्यांच्या पोराकडून देखील आता मराठा समाजाला काहीच अपेक्षा उरलेल्या नाहीत. त्या मुर्ख माणसाची आधी हकालपट्टीच करा, असेही आ.मेटे म्हणाले.

Tagged